अनिल गोटेंच्या संभाषणाची 'ती' ऑडिओ टेप 'राष्ट्रवादी'कडून उघड

अनिल गोटे-राधेश्‍याम मोपलवार
अनिल गोटे-राधेश्‍याम मोपलवार

मांगले अपहरण, मोपलवार प्रकरणाशी संबंध

धुळे : राज्य रस्ते विकास महामंडळाचे पदच्युत उपाध्यक्ष राधेश्‍याम मोपलवार यांच्याशी आणि मांगले अपहरण प्रकरणाशी संबंधित सत्ताधारी भाजपचे आमदार अनिल गोटे आणि भाजपच्याच एका भिसे नावाच्या कार्यकर्त्यामधील सव्वासात मिनिटांच्या संभाषणाची खळबळजनक 'ऑडिओ टेप' राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत ऐकवली.

विधिमंडळ अधिवेशनातील लक्षवेधी सूचनेचा वापर सत्ताधारी आमदार गोटे हे गैरव्यवसायासाठी करीत असल्याचा गंभीर आरोप मोरे यांनी केला. या प्रकरणी आमदार गोटे यांची 'ईडी'सह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभाग आणि 'एसआयटी'कडून तत्काळ चौकशी व्हावी, अशी मागणी मोरे यांनी केली. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर दूरध्वनीव्दारे प्रतिक्रिया देताना आमदार गोटे म्हणाले, की 'होय, संभाषणातील आवाज माझा आहे'. याबाबत धुळ्यात उद्या (ता. 12) सकाळी अकराला पत्रकार परिषदेत भूमिका मांडेल.

भाजपच्या भूमिकेचे वाभाडे
श्री. मोरे म्हणाले, की अब्दुल करीम तेलगीच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यातील आरोपी व जामिनावर सुटलेले आमदार गोटे यांच्याप्रमाणेच या प्रकरणात मोपलवार हेही जामिनावर सुटलेले आहेत. अशा अधिकाऱ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे काम सोपविलेच कसे, हा कळीचा प्रश्‍न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचार मुक्तीबाबत 'न खाऊंगा ना खाने दूँगा' या भूमिकेसह भाजपप्रणीत युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शी कारभाराचे वाभाडे आमदार गोटे यांनी काढल्याचे त्या 'ऑडिओ टेप'वरून कळते. तसेच या प्रकरणातून आमदार गोटे यांच्या सभ्यतेसह नैतिकेवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

सखोल चौकशीची मागणी
धुळे शहरातील सलग 13 वर्षांतील आमदारकीत गोटे यांनी शहराचा विकास, बेरोजगारांच्या प्रश्‍नावर कधीही लक्षवेधी सूचना मांडली नाही. मात्र, त्यांनी अधिवेशनात लावलेली लक्षवेधी सूचना भ्रष्ट अधिकारी, मोठ्या अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत होती. अशात मोपलवार प्रकरणी गोटे आपल्याच भाजप सरकारची कोंडी करत असताना गोटे यांनीही मोपलवार प्रकरणात हात शेकून घेतल्याचा आरोप आहे. गोटे यांचे खाण्याचे व दाखविण्याचे दात वेगळे आहेत. हे त्यांच्या संभाषणातील 'ऑडिओ टेप'वरून कळते. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रथम दाद मागणार आहे. आमदार गोटे 13 वर्षांपासून शहराचे आमदार असल्याने 'ऑडिओ टेप'मध्ये त्यांचाच आवाज असल्याचा आमचा दावा आहे. तरीही खातरजमा करण्यासाठी आमदार गोटे यांच्याशी संबंधित 'ऑडिओ टेप'मधील संभाषणाची 'फॉरेन्सिक लॅब'कडून तपासणी करावी. तसेच या प्रकरणी 'एसआयटी', 'ईडी', लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभागासह निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून गोटे, भिसे, केळकर यांची पारदर्शकतेने चौकशी करावी.

'त्या' हॉटेलमधील कारभार तपासा
मुंबई क्राईम ब्रॅंचबाबत आमदार गोटे यांनी केलेले विधान गंभीर असून, त्याची गांभीर्याने चौकशी व्हावी. गोटेंचे आमदारकीचे अर्थात विधानसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करावे. आमदार निवासऐवजी आमदार गोटे मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये राहून जो काही कारभार करतात त्याचीही चौकशी करावी, अशी मागणी मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

दोघांमधील संभाषणाचा आशय
आमदार गोटे व भिसे यांच्यातील संभाषणाची लिखित 'स्क्रिप्ट'ही श्री. मोरे यांनी पत्रकारांना दिली. त्यातील सारांशातील आशय असा :
गोटे : माझ्या अर्जावरून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मांगले किडनॅपिंग प्रकरणी मुंबई क्राईम ब्रॅंचकडे तपास दिला.
भिसे : घेणे आहे म्हणून काम करताय ना आपण.
गोटे : मोपलवार लायकीचा नाही, जिवापेक्षा पैसे महत्त्वाचे आहे काय?
भिसे : साहेब, करत होतो ऍरेजमेंट, झाली नाही. त्याच्या मुलाबाळांकडे पाहा, आमच्या पाठीशी असलेला 'सपोर्ट' तुम्ही काढू नका, तुमच्या मार्गदर्शनाखाली काय करायचे ते करू, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तुम्ही माझे नेते आहात, तुमच्या शब्दाच्या बाहेर कधी गेलो आहे का?
गोटे : नागपूरला येताना जुनी करन्सी आणू नको, नवीन करन्सी आण. जुन्या करन्सीला कुणी बाप हात लावत नाही. आदेशाचा कागद घेऊन जा, मुंबई क्राईम ब्रॅंच माझ्या खिशातच आहे. मोपलवार मला सारखे फोन करतोय.
भिसे : आपण फोनवर जास्त नको बोलायला, समोरासमोर बोलू, माझे फोन टॅप होताहेत ना.
गोटे : मी कुणाच्या बापाला घाबरत नाही.
भिसे : साहेब, तुम्ही जी लक्षवेधी करणार होते ती आता नाही करणार ना?
गोटे : लक्षवेधी करणार आहे. ...नाही सांगितले तर नाही करणार.
भिसे : सकाळी निघताना फोन करतो. तुम्ही कुठे असाल?
गोटे : मी हाउसमध्ये असेल. केळकरचा नंबर तुला दिला आहे. त्याच्याशी संपर्क साध.

'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com