देशातील बेईमानांची खैर नाही : नरेंद्र मोदी

बेईमानांची खैर नाही : नरेंद्र मोदी
बेईमानांची खैर नाही : नरेंद्र मोदी

मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील बेईमानांची खैर नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाळगणाऱ्यांना आज येथे इशारा दिला. याच वेळी मुंबईतील विविध प्रकारच्या सुमारे एक लाख सहा हजार कोटी रकमेच्या प्रकल्पांचे मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन करून भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीचा नारळ फोडला.

शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी मुंबईत आलेल्या मोदी यांची जाहीर सभा वांद्रा-कुर्ला संकुलात आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. भाषणाच्या सुरवातीला "भारत माता की जय' अशी घोषणा देत "छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा करतो,' अशी मराठीतून मोदी यांनी भाषणास सुरवात केली.
या वेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वेंकय्या नायडू, पीयूष गोयल, रामदास आठवले, खासदार छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे भोसले यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

मोदी म्हणाले, ""आठ नोव्हेंबरला काळ्या पैसेवाल्यांवर आम्ही मोठा हल्ला चढवला. नोटाबंदीचा निर्णय घेऊन बनावट नोटा आणि काळ्या पैशाविरुद्ध आम्ही निर्णायक युद्ध पुकारले. काळ्या पैसेवाल्यांनी बॅंकवाल्यांचेदेखील नुकसान केले आहे. काही दिवसांनंतर प्रामाणिक लोकांचे हाल निश्‍चितच कमी होतील आणि काळे पैसेवाल्यांचे हाल वाढतील. सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात काम सुरू केले आहे. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे देशाच्या भल्यासाठी सुरू केलेले सफाई अभियान आहे. बेईमान लोकांच्या बरबादीची वेळ आता सुरू झाली आहे. जोपर्यंत देश जिंकणार नाही, तोपर्यंत लढाई सुरूच राहील. काळ्या पैशांविरुद्धची लढाई जोपर्यंत आम्ही जिंकत नाही, तोपर्यंत थांबणार नाही.''

या वेळी मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गुणगौरव केला. महाराजांचे प्रशासन, त्यांचे गडकिल्ले याबाबत भाषण केले. ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः चलन निर्माण केले, परदेशातून घेतले नाही. असा पराक्रमी राजा जगात होणे नाही. आज जगाला आकर्षित करण्याची ताकद भारताने निर्माण केली आहे. विकासाबाबत बोलताना मोदी म्हणाले, की देशाच्या सर्व समस्यांवरील विकास हा एकमात्र उपाय आहे. विकासामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात बदल झाला आहे. सन्मानाने जगण्यासाठी विकास हा एकमेव मार्ग आहे. सरकारच्या विविध योजनांचा केंद्रबिंदू हा गरीब आहे. एक हजार दिवसांमध्ये हजार गावांमध्ये विद्युत जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोट्यवधी गरीब कुटुंबांना गॅस सिलिंडर
देण्याचे लक्ष्य ठेवले आणि ते आम्ही पूर्ण करत आहोत. किरकोळ निवृत्तिवेतन मिळणाऱ्यांना आम्ही हजार रुपये निवृत्तिवेतन दिले.देशातील 58 हजार गावे स्वातंत्र्यापासून अंधारात आहेत. त्यांना हजार दिवसांत आम्ही 18 हजार गावांत वीज पोचवण्याचे काम केले. कोण म्हणतो देश बदलणार नाही? सव्वाशे कोटी जनतेच्या ताकदीवर देश नक्कीच बदलेल आणि पुढे प्रगती करेल. निवडणुकीतील जनतेचा कौल हा सरकारने घेतलेले निर्णय बरोबर की चूक आहेत, याचे अंदाज वर्तवित असतो. त्यामुळे नोटाबंदीनंतर राज्यात नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये येथील जनतेने भाजपला भरभरून मते दिली. सर्वसामान्य, गरीब माणूस आमच्यासोबत आहे, असेही मोदी यांनी ठामपणे सांगितले.

गेली सत्तर वर्ष जे मलई खात आले आहेत, असे विधान करत मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्ला चढवला. ते म्हणाले, की सत्तर वर्षे मलिदा खाणारे, असे तगडेतगडे आपली ताकद लावून विकासात अडथळा आणत आहेत. त्यांनी कसलीही कसर सोडली नाही. तरीही मी मागे हटलो नाही.

मुंबईत 200 किलोमीटरची मेट्रो : मुख्यमंत्री
येत्या पाच वर्षांत मुंबई एमएमआर क्षेत्रात दोनशे किलोमीटरचे मेट्रोचे जाळे उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली. या प्रकल्पामुळे भिवंडीपासून कल्याण-मुंबईच्या आसपास शहरांतील नव्वद लाख प्रवाशांना फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवडी-न्हावा शेवा या सागरी महामार्गामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचे अंतर फक्‍त अर्ध्या तासाचे होईल, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखून दिलेल्या नियमांनुसार आणि रयतेचे राज्य या परिपाठाच्या आधारावर शासनाचा कारभार चालवणार आहे.

तीन लाख कोटींचे रस्ते : गडकरी
येत्या तीन वर्षांत राज्यात तब्बल तीन लाख कोटींपेक्षा अधिक रक्‍कम खर्च करून नव्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. आम्हाला विकासाचे राजकारण करायचे आहे. यासाठी शिवशाही आणायची असून, पंतप्रधानांच्या माध्यमातून तसे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात युतीचे सरकार असताना छत्रपती शिवरायांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे, अशी इच्छा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्‍त केली होती. त्यांच्या स्वप्नातले स्मारक आम्ही उभारत आहोत, असेही गडकरी म्हणाले. या वेळी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात रेल्वे प्रकल्पांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विविध सामंजस्य करार झाले. मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com