सामाजिक संघटनेत पडणारी फूट

एक समस्या... एक चिंतन!
Social organisation
Social organisationSakal

कुठल्याही सामाजिक संघटनेच्या स्थापनेमागे एक ‘उद्देश’, एक ‘विचार’ किंबहुना एक ‘लक्ष्य’ असते आणि ते प्राप्त करण्यासाठी संघटनेची उभारणी व बांधणी केली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर देशभरात व महाराष्ट्रात असंख्य संघटना उभ्या राहिल्या. कधी त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी तर कधी राजकारणासाठी, समाजकारणासाठी, कधी शेतकरी तर कधी कामगारांसाठी, कधी धर्मासाठी तर कधी जातीसाठी अशा असंख्य कारणांसाठी अनेक संघटना उभ्या राहिल्या.

प्रत्येक संघटना आपल्या उद्देशप्रती कार्यरत असताना कालांतराने तिच्यात काही बदल घडताना काळ, वेळ, परिस्थिती अनुसार ज्या संघटनेने लोकशाही मान्य केली व लवचिक धोरण स्वीकारले आणि त्यांनी दीर्घकाळ कार्य केले. परंतु हुकूमशाही वृत्ती, कट्टरता, कडवेपणा, टोकाची भूमिका यामुळे व व्यक्तिगत महत्वाकांक्षा, दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती, सहकाऱ्यांचा अपमान करणे, त्यांना कमी लेखणे, त्यांना तुच्छ ठरवणे, त्यांचे मनोबल खच्ची करणे, इत्यादी गोष्टींमुळे संघटनेमध्ये अस्वस्थता पसरते. नेतृत्व हे कुठल्याही संघटनेचे अत्यंत महत्त्वाचे असते. ‘Leaders should lead the way by setting out visionary examples.’ नेतृत्वाचा निर्णय हा जवळपास सगळ्या संघटनेमध्ये मान्य असतो. नेतृत्व जर हलक्या कानाचे असेल, ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवणारे असेल, चंचल असेल, दृष्टिकोन नसलेले पण व्यक्तिगत महत्वाकांक्षा असली तर त्यामुळे संघटनेला मोठी बाधा निर्माण होते.

राष्ट्रीय पातळीवर जर आपण पाहिलं तर एकीकडे संघटना म्हणून स्थापन झालेली ‘काँग्रेस’ आपली सव्वाशे वर्षे पूर्ण करत आहे. दुसरीकडे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आपली १०० वर्षे पूर्ण करत आहेत. कालांतराने कॉंग्रेस प्रमुख पक्ष म्हणून पुढे आला. काँग्रेसने सुद्धा स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक फुटी अनुभवल्या. त्यात प्रामुख्याने इंडिकेट काँग्रेस व सिंडीकेट काँग्रेस व समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आदी. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेमध्ये अशा प्रकारची कुठलीही मोठी घटना व फूट झाल्याचे आपल्याला ऐकिवात नाही. काँग्रेस पुरोगामी विचारांची लोकशाही मानणारी संघटना आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना उजव्या विचारांची आणि एकचालकानुवर्तीत्व अशी संघटना आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापन केलेल्या भारतीय जनता पक्षात मात्र पक्षांतर हे लोकशाही पद्धतीने कार्यरत आहे असे दिसते. काँग्रेस संघटना मात्र राजकारणात घराणेशाहीमध्ये गुंतून पडली हे इथे दुर्दैवाने नमूद करावे लागेल.

राज्यस्तरीय पातळीवर १९८० च्या दशकांमध्ये स्थापन झालेल्या सामाजिक संघटनांमध्ये बामसेफ (Backward Class & Minorities Employee Fedaration) विविध शेतकरी संघटना, अखिल भारतीय मराठा महासंघ, दलित पॅंथर इत्यादी संघटना दिसतात. तसेच १९९० च्या नंतर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना या सर्व संघटनेमध्ये वेळोवेळी फूट झाल्याचे आपण पाहतो. तसेच एकीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये वेळोवेळी फूट पडून परत ऐक्याची चर्चा झालेली दिसते. दुसरीकडे जहाल व कट्टरवादी शिवसेनेतूनसुद्धा फुटून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयार झाली. परंतु कुठलीही मोठी वैचारिक चळवळ दीर्घकाळ चालत नाही. कालांतराने त्यात बदल होत जातात. तसेच संघटनांमध्ये सुद्धा काही बदल अपेक्षित असतात. संघटनात्मक पदाधिकाऱ्यांमधला बदल हा नेहमी वादग्रस्त ठरलेला आहे. कुठल्याही संघटनेमध्ये विचार, उद्देश, तत्त्व यावरुन कधीही फूट झालेली नाही परंतु संघटनेमध्ये व्यक्तिगत महत्वाकांक्षा मानपमान, नाकारलेले अधिकार व आरोप प्रत्यारोप व अविश्वासामुळे संघटनेत फूट पडली आहे.

अलीकडच्याच काळामध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, बामसेफ या समाजातकार्यरत असलेल्या महत्वाच्या संघटना व त्यांच्यात झालेल्या फुटी प्रचंड दुर्दैवी व वेदना देणाऱ्या आहेत. बामसेफ ही संघटना शिस्तबद्ध, विचारधारेशी प्रामाणिक राहून पूर्ण वेळ कार्यकर्त्यांच्या मदतीने वक्ते, साहित्य निर्मिती यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग चालवते. संघटनात्मक बांधणीसाठी प्रशिक्षण वर्ग चालवतात (Organisational cadre camp) व संघटनेचा उद्देश आणि विचार याचा अभ्यास वर्ग घेतला जातो (Historical cadre camp). अत्यंत प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या संघटनांमध्ये सुद्धा फूट पडते त्यांचे मलाही आश्चर्य वाटते. काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये उभी फूट पडली यामध्ये प्रामुख्याने दीर्घकाळ अध्यक्षपद भूषवणारी व्यक्ती व संपत्तीचा वाद हे मुख्य कारण आहे. छावा संघटना ही शिकलेल्या प्राध्यापकांनी सुरु केलेली संघटना आहे. चांगला उद्देश, विचार, दृष्टिकोन समोर ठेवून सुरु झालेली संघटना अनेकवेळा फुटली आहे. मराठा सेवा संघ आणि त्याचे ३२ कक्ष याला सुद्धा अनेक वेळा फुटीचा सामना करावा लागला. संभाजी ब्रिगेड ही युवकांची संघटना सुद्धा काही वर्षापूर्वी फुटली. सर्वसामाजिक चळवळीतील संघटनेमध्ये फूट का पडते याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

सर्व सामाजिक चळवळींचे व संघटनेचे रुपांतर कालांतराने राजकीय पक्षात झालेले दिसते. काँग्रेस ही स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेली चळवळ एका राजकीय पक्षात रूपांतरित झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथम जनसंघ व नंतर भारतीय जनता पार्टी हा पक्ष निर्माण केला. बामसेफ संघटनेत राजकीय पक्ष स्थापन करण्यामध्ये मतभिन्नता असल्यामुळे त्यांच्या फूट पडली, परंतु संघटनेचे काम चालू ठेवून बहुजन समाज पार्टी एका वेगळ्या गटाने स्थापन केली. अशाच प्रकारे यशवंत सेनेतून राष्ट्रीय समाजपक्ष, मराठा महा संघातून शिव-संग्राम संघटना व नंतर पक्ष, शेतकरी संघटनेतून प्रथम संघटना व नंतर राजकीय पक्ष, संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेतून राजकीय पक्ष, छावा संघटनेतून क्रांतिसेना अशा प्रकारे सामाजिक संघटनेतून राजकीय पक्ष निर्माण होत असताना वैचारिक द्वंद व संघर्ष निर्माण होऊन ज्यांना सामाजिक संघटना चालवायची होती, त्यांनी ती चालू ठेवली व ज्यांना राजकीय पक्ष करायचा होता त्यांनी आपल्या महत्वाकांक्षेपोटी नवीन पक्षाची स्थापना केली. अनेक कारणांपैकी हे एक प्रामुख्याने सामाजिक संघटनेच्या फुटीचे कारण दिसते. या व्यतिरिक्त आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, संपत्तीवरचे दावे यातून मतभिन्नता मतभेद होऊन आरोप प्रत्यारोपांमुळे सुद्धा संघटना फुटलेली दिसते. या सगळ्या सामाजिक संघटनांना मानणारा जो वर्ग असतो त्याचा मात्र कुठलाही दोष नसून त्या वर्गाला किंमत मोजावी लागते.

आता अनेक संघटना नव्याने स्थापन होत आहेत. परंतु या संघटनांपुढे उद्देश, विचार, दृष्टिकोन, कार्य, धोरण यांचा अभाव असेल तर त्या फार काळ प्रभाव टाकतील असं वाटत नाहीत. नुकतीच ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना झालेली आहे. या संघटनेचा उद्देश,विचार, संघटनेची बांधणी व कार्यक्रम जाहीर झाला नसल्याने सर्व लोक संभ्रमावस्थेत आहेत. संघटना स्थापनेपूर्वी तिचा उद्देश, विचार आणि कुठल्या वर्गासाठी ती कार्यरत राहणार आहेत ते स्पष्ट होणे गरजेचे असते. अन्यथा संघटनेचा जन्म होऊन ती कमी कालावधीतच नष्ट होऊन जाते. आपापल्या संघर्षामुळे चळवळींचा व विचारधारेचा ऱ्हास होतो. तसेच सामाजिक चळवळीतील लोक समविचारांनी एकत्र आलेले असतात परंतु काही मतभेद किंवा महत्वकांक्षांमुळे पुढे कायमचे दुरावताना दिसतात. आणि अशा कारणांमुळे चळवळींचे होणारे नुकसान न भरुन येण्याइतकं होतं. या साऱ्याकडे खूप गांभीर्याने बघितलं पाहिजे. जुन्या संघटनेचा संघर्ष, फुटीचा इतिहास, द्वेष, नेतृत्वाची हुकूमशाही, संघटनेची व कार्यकर्त्यांची होत असलेली ससेहोलपट लक्षात घेता सर्व बहुजन समाजाला संघटनेत व चळवळीत सामील होण्यापूर्वी विशेषतः तरुणांनी आपल्या आयुष्याचा बहुमोल वेळ, उमेद, ऊर्जा, पैसे, कारकीर्द खर्ची घालण्यापूर्वी प्रदीर्घ चिंतन करावे, योग्य ती पावलं उचलावीत, मग निर्णय घ्यावा अन्यथा आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल…!

फुटीमुळे मानणाऱ्या वर्गाचे नुकसान

महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना अथवा चळवळी उभ्या राहिल्या व कालांतराने त्या संपल्या. त्या संपण्यामागे मुख्य कारण संघटनेतील फूट, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये बेबंदशाही आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ, दलित पॅंथर, विविध शेतकरी संघटना, कामगार संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, बामसेफ, राष्ट्र सेवा दल इत्यादी अशा अनेक नामवंत व महत्वाच्या संघटनांमध्ये वेळोवेळी फूट पडल्याचे आपण पाहतो. यात ज्या उद्देशाने, ज्या विचाराने, ज्या समुदायासाठी या संघटना चालवल्या जातात या फुटीने त्यांना मानणारा वर्गाचा कुणीही गांभीर्याने विचार करत नाही. त्यांना होणारे दुःख, कष्ट व त्यासमुदायाचे होत असलेले नुकसान याचे पदाधिकाऱ्यांना भान नसते.

(सदर लेखाचे लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com