आनंदाने जगण्यात आहे 'स्मार्ट सिटी'चा पाया...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

आनंदाने जगण्याच्या तुमच्या संकल्पना काय आहेत?

वास्तूरचनाकार हबीब खान यांनी नाशिकमध्ये 'सकाळ'च्या कार्यक्रमात बोलताना 'स्मार्ट सिटी'बद्दल अनोखी भूमिका मांडली आहे. आनंदाने जगूया... हाच स्मार्ट सिटीचा पाया आहे, असे ते म्हणाले आहेत. स्मार्ट केवळ सिटीच नव्हे; प्रत्येक गाव बनू शकते. आनंदाने जगण्याचे मार्ग फक्त शोधता यायला हवेत. काय आहेत आपल्या आनंदाने जगण्याच्या संकल्पना? आमच्यासोबत शेअर करा : 
* प्रतिक्रियांमधून  - किंवा - 
* Email द्वारे. Subject मध्ये टाईप करा : Happy City  - किंवा - 
* सकाळ संवाद मोबाईल अॅप डाऊनलोड करा आणि आपला लेख पाठवा

नाशिक : आनंदाने जगण्याच्या संकल्पना दृढ व्हायला हव्यात, हाच 'स्मार्ट सिटी'चा पाया आहे, असे प्रतिपादन नागपूरचे वास्तुरचनाकार हबीब खान यांनी आज येथे केले. लोक आणि शहर 'स्मार्ट' होण्यासाठी सुंदर व सुखकर अशा जीवनशैलीची आपण कल्पना करायला हवी. ज्याठिकाणी राहणीमान गुणवत्तापूर्ण असेल, ते शहर खऱ्या अर्थाने 'स्मार्ट' मानले जाईल. हे साध्य होण्यासाठी समाजाची मानसिकता बदलावी लागेल, असेही त्यांनी अधोरेखित केले. 

'सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचा 28 वा वर्धापन दिन हर्षोल्हासात साजरा झाला. यानिमित्ताने गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात हबीब यांनी उपस्थितांशी 'स्मार्ट शहरे- एक पर्यायी दृष्टिकोन' या विषयावर संवाद साधला. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, 'सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, मुख्य संपादक श्रीराम पवार, उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने उपस्थित होते. 'सकाळ'तर्फे राबवण्यात आलेल्या 'स्मार्ट नाशिक' अभियानांतर्गत विविध क्षेत्रांतील व्यक्ती-संस्थांना 'स्मार्ट शिलेदार' पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

खान म्हणाले, की प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून 'स्मार्ट सिटी'कडे पाहतोय. कुणाला अत्याधुनिक पायाभूत सुविधा, तर कुणाला स्वयंपूर्ण तंत्रज्ञान हवे आहे. विशेषतः तरुणाईला प्रत्येक ठिकाणी 'वाय-फाय' असावे असे वाटते. म्हणजेच, 'स्मार्ट सिटी'बद्दल समाजामध्ये एकसारखे विचार नाहीत हे स्पष्ट होते. 

लोकप्रतिनिधी, प्रशासनाला प्रश्‍न सांगितल्यावर त्याचे निराकरण व्हायला हवे, असे वाटते. पण हा विषय मूलभूत सुविधांशी निगडित आहे हे विसरून चालणार नाही. प्रत्यक्षात वाहतूक, ऊर्जा, आरोग्य सुविधा, कचरा निर्मूलन या घटकांना प्राधान्य द्यावे लागेल. हे साध्य करताना स्थानिक गरजांची पूर्तता व्हायला हवी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येकाने गरजांवर नियंत्रण ठेवल्यास व्यवस्थेवर ताण येणार नाही. त्याचप्रमाणे संगीत, कला, संस्कृती याला महत्त्व देण्यातून जगण्याची गुणवत्ता वृद्धींगत होईल. 
 

Web Title: do you think happiness is foundation of smart city?