विधायक कार्य करणाऱ्यांना गौरविणार 

विधायक कार्य करणाऱ्यांना गौरविणार 

पुणे : क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते. अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि तिच्या तीन मुलांचा जीव वाचविणारे निवृत्त मेजर सुरेश भोसले, ससूनसारख्या सार्वजनिक रुग्णालयाचा कायपालट करणारे डॉ. अजय चंदनवाले आणि भिक्षेकऱ्यांवर मोफत उपचार करणारे डॉ. अभिजित सोनवणे यांनी सिद्ध केले आहे. 'सकाळ'चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. 20) या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. 

प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत वाटवानी यांचे व्याख्यान डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त होणार आहे. 'सामाजिक बदलांमागील प्रेरणेचा प्रवाह' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. हे व्याख्यान शिवाजीनगरमधील मॉडर्न कॉलेज रस्त्यावर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. या समारंभात पुण्यातील या सर्वांचा सत्कार डॉ. वाटवानी यांच्या हस्ते होणार आहे. 

1. विनायक वाळेकर : 
'सकाळ रिलीफ फंडा'च्या वतीने दुष्काळग्रस्त भागात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांत योगदान देण्याची इच्छा पुण्यातील उद्योजक विनायक वाळेकर यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी मे 2016 मध्ये पोकलेन मशिन विकत घेतले आणि ते "सकाळ'कडे सोपविले. या मशिनची देखभाल दुरुस्ती, ऑपरेटरचा पगार हा सगळा खर्च ते स्वतः करीत आहेत. त्यामुळे अनेक गावांतील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. 

2. श्रीपाद घोडके :
श्रीपाद घोडके आणि त्यांची पत्नी शलाका यांनी स्वत:च्या पगारातील काही रक्कम बाजूला काढत अनाथालयातील मुलांच्या दहावीनंतरच्या शिक्षणासाठी त्यांना मदत करीत आहेत. दुर्गम भागातील आठ मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी हे दांपत्य सध्या सांभाळत आहे. 

3. मेजर (निवृत्त) सुरेश भोसले : 
नैराश्‍यातून एक महिला तीन महिन्यांचे बाळ, तसेच सहा व आठ वर्षांच्या दोन मुलींना बरोबर घेऊन मुंढव्याजवळील कालव्यात उडी मारते. त्या वेळी तेथे जमा झालेली गर्दी फक्त बघ्याच्या भूमिकेत असते. मात्र, भोसले यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी मारली आणि चार जीव वाचविले. 

4. डॉ. अजय चंदनवाले :
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून आठ वर्षांपूर्वी सूत्रे हाती घेतलेल्या डॉ. चंदनवाले यांनी ससून रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रयोग केले. त्यामुळे रुग्णांना चहा-नाष्ट्यासह पोषक आहार मिळू लागला असून, "सीएसआर"च्या माध्यमातून नवजात अर्भक विभाग, बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रिया कक्षाचा चेहरा-मोहरा बदलला गेला. 

5. डॉ. अभिजित सोनवणे : 
आंतरजातीय विवाह केल्यावर डॉ. सोनवणे आणि त्यांची पत्नी डॉ. मनीषा यांना संघर्षाला सामोरे जावे लागले. नैराश्‍यात असताना एका भिक्षेकऱ्याने धीर दिला. त्यानंतर अभिजित यांनी पत्नीच्या मदतीने शेकडो भिक्षेकऱ्यांना शोधून त्यांच्यावर उपचार केले. म्हणूनच त्यांना 'डॉक्‍टर फॉर बेगर्स' म्हटले जाते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com