तत्त्वज्ञांची उदासीनता घातक

Philosophy
Philosophy

पूर्णा (जि.परभणी) येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या ३३ व्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश.

ज्यांची अभ्यास विषयाच्या बहुविधतेला वा मानवी जीवनाच्या व्यामिश्रतेला सामोरे जायची तयारी नसते, ज्यांना मानवी जीवनाच्या व्यामिश्रतेची पुरेशी कल्पना नसते, ते तत्त्वज्ञानाच्या एकांगी संकल्पनेला चिकटून बसतात. तत्त्वज्ञानात काहीही वर्ज्य नाही. कोणत्याही विषयाच्या गाभ्याला भिडणारे चिंतन म्हणजे त्या विषयाचे तत्त्वज्ञान.

त्यामुळे विशेषीकरणाच्या युगात तत्त्वज्ञानाचे काय होणार ही भीती निरर्थक आहे. तत्त्वज्ञान ही इतर ज्ञानशास्त्रांप्रमाणे विशिष्ट विषयाचा अभ्यास करणारी शाका नाही. तिचे स्वरूप वेगळे आहे. जितके विशेषीकरण वाढते, तितकी तत्त्वज्ञानाची व्याप्ती व जबाबदारी वाढते. प्रत्येक ज्ञानशाखा ही एखाद्या विशिष्ट शाखेचे ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाची विशिष्ट प्रकाराने केलेली भाषिक मांडणी असते. पण मुळात ज्ञान म्हणजे काय? ते मिळवण्याची पद्धत कोणती? ते विश्‍वसनीय कसे ठरते? त्याच्या मांडणीचे किंवा रचनेचे स्वरूप काय असले पाहिजे? या प्रश्‍नांची चर्चा त्या ज्ञानशाखेत केली जात नाही, ती चर्चा तत्त्वज्ञानाला करावी लागते. पण त्यासाठी तत्त्वज्ञानाला त्या विशिष्ट ज्ञानशाखेचाही अभ्यास करावा लागणार हे उघड आहे. म्हणजेच तत्त्वज्ञान ही एक मोठी जबाबदारी आहे! कदाचित वैज्ञानिकाच्या जबाबदारीपेक्षाही अधिक!

कार्ल पॉपर यांच्या आधारे हा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे मांडता येईल. पॉपर म्हणतात की ‘Specialization may be a natural temptation to a scientist, for philosopher, it is mortal sin.’ विशेषीकरण हे वैज्ञानिकासाठी स्वाभाविक आकर्षण असेल, पण तत्त्ववेत्त्यासाठी ते आत्मघातकी पातक आहे.
त्यामुळेच तत्त्वज्ञान ही स्वाभाविकपणे आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा बनते. इतर ज्ञानशाखांच्या पद्धतीशास्त्रांचा अभ्यास करतना तत्त्वज्ञान त्या ज्ञानशाखांच्या ज्ञानविषयापासून स्वतःला पूर्णतः अलिप्त ठेवू शकतच नाही. तसे करण्याचा प्रयत्न हा ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’मधील शायलॉकला दिलेल्या आव्हानासारखा ठरेल. एक पौंड मांस शरीरातून कापून काढायचे; पण कसे तर रक्ताच्या एक थेंबही न सांडू देता.
एखाद्या शास्त्राच्या पद्धतीशास्त्राचा अभ्यास करताना त्या शास्त्रातील प्रमेयांना स्पर्श होतच असेल, तर त्या प्रमेयांत जमेल तेवढे खोलवर का जाऊ नये हा एक मुद्दा, आणि अशा अनेक शास्त्रांच्या पद्धतीशास्त्रांचा अभ्यास करताना त्या त्या शास्त्रांच्या प्रमेयांना होणारा स्पर्श व अनेक पद्धतीशास्त्रांचा अभ्यास करून वाढलेला आवाका हा दुसरा मुद्दा. त्यामुळे एक वेगळा दृष्टिकोन विकसित होतो. जेथून तुम्हाला वेगवेगळी प्रमेये, घटना यांच्यातील परस्परसंबंध दिसू लागतात. मग ते वेगवेगळ्या सामाजिक शास्त्रांमधील असतील, किंवा वेगवेगळ्या नैसर्गिक शास्त्रांमधील असतील किंवा सामाजिक शास्त्रे आणि नैसर्गिक शास्त्रे यांच्यामधील असतील.

आता तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे तुमची एवढी तयारी होत असेल, तर गरज पडली असता तुम्ही तुमचा दुसरा स्तर सोडून पहिल्या स्तरावर का येऊ नये? मी तुम्हाला अनुभवातून सांगतो, एखाद्या शास्त्रातील एखादी गोष्ट त्या शास्त्राच्या अधिकृत अभ्यासकापेक्षा तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाला अधिक चांगली समजू शकते, असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही. तत्त्वज्ञानाने तुमच्या आकलनाच्या कक्षा रुंदावतात, तुमची बुद्धी अधिक धारदार व टोकदार होते.
तत्त्वज्ञान म्हणजे विश्‍लेषण अशा प्रकारची भूमिका घेणारे विद्वान तत्त्वज्ञान एखाद्या हत्यारासारखे असल्याचे मानतात. ठीक आहे, ते चाकू किंवा सुरी आहे आणि मग तत्त्वज्ञान शिकणे म्हणजे या सुरीला धार लावणे; पण शेवटी या धार लावलेल्या सुरीने तुम्ही काहीच कापणार नसाल तर त्याचा काय उपयोग? तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांनी ज्ञानव्यवहाराच्या इतर क्षेत्रांपासून इतकेच काय, परंतु सामाजिक व्यवहारांपासूनसुद्धा स्वतःला अलिप्त ठेवणे चुकीचे आहे. तत्त्वज्ञांच्या अशा अलिप्ततेमुळेच भारतात पूर्वीच्या काळी धर्माच्या नावाखाली अस्पृश्‍यतेसारखे घातक प्रकार रूढ झाले. तत्त्ववेत्त्यांनी रस्त्यावर येऊन मोर्चे वगैरे काढावेत असे मी म्हणणार नाही; पण सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक वा सांस्कृतिक प्रश्‍नांबद्दल उदासीन वा अलिप्त राहणे हेसुद्धा त्यांच्यासाठी योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाड येथे चवदार तळ्यात पाणी पिण्याचा वा नाशिकला मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह करीत होते, तेव्हा देशातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासक काय करीत होते, असा प्रश्‍न विचारला तर बऱ्याच जणांना ते रुचणार नाही.

बुद्धांनी तत्त्वज्ञानाला करुणेची जोड दिली होती आणि मार्क्‍सने विद्रोहाची. बाकीच्यांचे जाऊ द्या; परंतु ज्याला आपण आद्य आणि आदर्श तत्त्वज्ञ मानतो त्या सॉक्रेटिसचा विचार केला तरी मला काय म्हणायचे आहे ते समजू शकेल. आपण सॉक्रेटिसच्या विचारपद्धतीविषयी नेहमी बोलत असतो. सॉक्रेटिसने अथेन्समधील सर्व प्रकारच्या लोकांशी सातत्याने संवाद केला. त्यांच्या डोक्‍यात असलेल्या संकल्पनांची चिकित्सा केली. त्यासाठी वेळ आली तेव्हा आपले प्राणही पणाला लावले.
सॉक्रेटिसने ज्याचे विश्‍लेषण वगैरे केले, त्या संकल्पना माणसाच्या साक्षात जगण्याशी निगडित होत्या. मग तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञ अलिप्त कसे राहू शकतात? तत्त्वज्ञान ही जोखीमच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com