आठ दिवसांमध्ये होतील अधिकाऱ्यांच्या बदल्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

सोलापूर - राज्याच्या महसूल प्रशासनातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्‍न येत्या आठ दिवसांत मार्गी लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि काही अधिकारी बदल्यांच्या विरोधात न्यायालयात गेल्याने या वर्षी महसूल प्रशासनातील बदल्यांना विलंब झाल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. 

खासगी दौऱ्यानिमित्त महसूलमंत्री पाटील आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील नगर परिषदा, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात ठेवू नये, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यामुळे कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्‍यता होती. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील काही अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने बदली प्रक्रियेला विलंब झाला. 

तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी बदल्यांसाठी तयार केलेली यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासणीसाठी निवड मंडळाकडे पाठविली होती. ही यादी तपासून झाली का? याबाबत महसूलमंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ""न्यायालयात हा विषय प्रलंबित असल्याने हे काम अपूर्ण राहिले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये बदल्यांचा प्रश्‍न मार्गी लागेल.‘‘