एकनाथ खडसेंविरुद्ध अखेर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मुंबई, पुणे - पुणे येथील भोसरी "एमआयडीसी'तील भूखंड प्रकरणात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह चौघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रात्री अखेर गुन्हा दाखल केला, त्यामुळे खडसेंच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. या जमीन खरेदीप्रकरणी उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, त्यानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

भोसरीतील "एमआयडीसी'ची सुमारे तीन एकर जमीन खडसे यांच्या पत्नी व जावयाच्या नावाने नाममात्र दरात खरेदी केल्याचा व्यवहार नियमबाह्य झाल्याचा आरोप करणारी फौजदारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत गवंडे यांनी केली आहे. तत्कालीन महसूलमंत्री असलेल्या खडसे यांनी व्यवहार पूर्णत्वास नेण्यासाठी मंत्रालयातही बैठका घेतल्या होत्या. बाजारमूल्य सुमारे 31 कोटी 25 लाख असतानाही या भूखंडाचा (सर्व्हे क्र. 52-2अ-2) व्यवहार सुमारे 3 कोटी 75 लाखांत झाल्याचा आरोप याचिकादाराने केला आहे. ही जमीन सातबारा उताऱ्यावर "एमआयडीसी'च्या नावावर आहे. गवंडे यांच्या तक्रारीनुसार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी आणि अब्बास रसूलभाई उकानी यांच्याविरुद्ध आज भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 13 (1) (ड), 13 (2), 15 आणि भारतीय दंड संहितेचे कलम 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रसाद हसबनीस करत आहेत. 

"एसीबी'ने खडसे यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने आधीच्या सुनावणीवेळी केला होता; तसेच खडसेंविरुद्धचा तपास "एसीबी'कडे का सोपविण्यात आला नाही, अशी विचारणाही राज्य सरकारला केली होती. फौजदारी कारवाईबाबतचा निर्णय सरकारने घ्यावा, अन्यथा आम्ही आदेश देऊ, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. आरोपांचे स्वरूप लक्षात घेता लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत बंडगार्डन पोलिस त्याचा तपास करू शकत नाहीत, असे राज्य सरकारने न्यायालयात स्पष्ट केले होते. त्यानंतर हे प्रकरण "एसीबी'कडे सोपविण्यात आले होते. खडसेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी सरकारने न्या. झोटिंग यांची समितीही स्थापन केली आहे. या समितीच्या चौकशीचा आणि "एसीबी'च्या तपासाचा काहीही संबंध नाही, असे न्यायालयाने सांगितले होते. झोटिंग समितीसमोर खडसे यांनी आपली बाजू मांडली आहे. या समितीने अद्याप अहवाल दिलेला नाही. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर उद्या न्यायालयात सुनावणीपूर्वी "एसीबी'ने बंडगार्डन पोलिस ठाण्यात अखेर खडसेंविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

Web Title: Eknath Khadse filed against