विद्युत सहायकांना महिनाभरात नोकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - विद्युत सहायकांच्या तीन हजार 34 जागांची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे निवेदन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा व विधान परिषदेत केले. विद्युत सहायक पदासाठी 19 ऑगस्ट 2014 रोजी एकूण सहा हजार 242 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण, शालांत परीक्षा उत्तीर्ण (तत्सम परीक्षेमधील गुणवत्तेच्या आधारे निवड सूची), मराठी भाषा विषय शालांत परीक्षेमध्ये असणे आवश्‍यक ही शैक्षणिक अर्हता होती. या जाहिरातीमधून सहा हजार 63 उमेदवारांची निवड यादी 6 मे 2015 रोजी परिमंडळ कार्यालयांकडे कागदपत्रे पडताळणी व नियुक्तीसाठी वर्ग करण्यात आली होती. यापैकी तीन हजार 34 पदांची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे निवेदन बावनकुळे यांनी केले.