नेटीझन्स आता भाजपवरच उसळणार; 'हर हर महादेव'

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

केंद्रात आणि राज्याच भाजपचे सरकार आले तेव्हा त्यांच्याद्वारे सोशल मिडीयाचा केला गेलेला वापर हे त्यांच्या अभूतपूर्व यशामागचे महत्त्वाचे कारण मानले जात होते. त्यानंतर मात्र आता तीन वर्षानंतर हा सोशल मिडीया त्यांच्यावरच उलटेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

केंद्रात आणि राज्याच भाजपचे सरकार आले तेव्हा त्यांच्याद्वारे सोशल मिडीयाचा केला गेलेला वापर हे त्यांच्या अभूतपूर्व यशामागचे महत्त्वाचे कारण मानले जात होते. त्यानंतर मात्र आता तीन वर्षानंतर हा सोशल मिडीया त्यांच्यावरच उलटेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

असे वाटण्यामागचे कारण आहे, गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील तरुणांकडून फेसबूक आणि ट्विटरवर #उसळणार आणि त्यानंतर #HarHarMahaDev या हॅशटॅगखाली केंद्र आणि राज्य सरकार विरोधात व्यक्त होत असलेला असंतोष. अचानक सुरु झालेल्या या नव्या ट्रेंडने सोशल मिडीयात धुमाकूळ घातला. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून आणि वेगवेगळ्या विषयांबाबत हा हॅशटॅग वापरून पोस्ट केल्या जात असल्याने हे नेमकं काय सुरु आहे? नक्की काय उसळणार? याबाबत सगळेच बुचकळ्यात पडले. राज्यातील विविध पक्ष, संघटनांच्या लोकांक़डून या हॅशटॅग खाली पोस्ट टाकण्यात आल्या. सुरुवातीला अचानक राज्यातील अनेक अकाउंट्सवरून 'उसळणार' बाबत पोस्ट येत असल्याने नक्की काय आहे. याबाबत अनेकजण वेगवेगळे अंदाज बांधायला लागले होते. मराठा क्रांती मोर्चाशी याचा संबंध आहे असाही काही जणांचा समज झाला होता परंतू नंतर मात्र राज्यातील सर्व विरोधक एकत्रितरित्या सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांवर, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या माध्यमातून समाचार घेणार असल्याचे समोर आले.

राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांच्या नेत्यांवर वेळोवेळी भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. परंतू त्यांना लगेचच क्लीन चिट दिली जाते, सरकार विरोधात निघणारे मोर्चे, संप लोकांना अमिष दाखवून मिटवले जातात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील नाही, कर्जमाफीचा फायदा किती शेतकऱ्यांना झाला? अशा अनेक प्रश्न हा हॅशटॅग वापरून सोशल मिडीयावर विचारण्यात आले आहेत.

उसळणार नंतर मंगळवारी सायंकाळी 6 ते 9 दरम्यान #HarHarMahaDev या हॅशटॅगखाली गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारवर झालेले विविध भ्रष्टाचाराचे आरोप आणि सत्तेत येण्यापुर्वी त्यांच्याकडून देण्यात आलेली आश्वासने आणि त्यांची पूर्तता याबाबत जाब विचारण्यात आला. सायंकाळी सातच्या दरम्यान पुण्यात हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता.