आमदाराची पोलिस अधिकाऱयाला आई-बहिणीवरून शिविगाळ

अनिश पाटील
शुक्रवार, 19 मे 2017

सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांना आमदार रमेश कदम यांनी धमकावल्याची चित्रफीत वायरल झाल्यानंतर याप्रकरणी नागपाडा पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई : सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांना आमदार रमेश कदम यांनी धमकावल्याची चित्रफीत वायरल झाल्यानंतर याप्रकरणी नागपाडा पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कदम राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर आमदार झाले; भ्रष्टाचार प्रकरणी अटकेनंतर त्यांना राष्ट्रवादीने पक्षातून काढून टाकले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय महामंडळाच्या निधीतील 132 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी 2015 मध्ये रमेश कदमांना अटक झाली होती. वैद्यकीय तपासणीसाठी कदम यांना गुरुवारी (ता. 18) भायखळा कारागृहातून जे.जे. रुग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी कदम थेट चालत सुटले. पोलिस व्हॅन आली नसल्यामुळे पोलिस अधिकारी पवार यांनी कदम याला बाजूला उभे राहण्यासाठी सांगितले, अशी माहिती नागपाडा पोलिस ठाण्यातील एका अधिका-याने दिली. त्यामुळे संतापलेल्या कदम यांनी पवार यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर कदम यांनी पवार यांना आई-बहिणीवरून शिवीगाळही केली. पवार यांनी शांतपणे परिस्थिती हाताळली. या सर्व प्रकरणाचे पवार यांनी एका पोलिस शिपायाच्या मदतीने चित्रीकरण करून घेतले. दरम्यान, यावेळी कदम यांनी हक्कभंग आणण्याचीही धमकी पवार यांना दिली.

 

कदमने पवार हे 25 हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार त्यांच्या वरिष्ठांना करण्यास सहाय्यकाला सांगितले व रुग्णालयात जाण्यास नकार दिला. पुढे एकच्या सुमारास कदम यांना रुग्णालायत नेण्यात आले. तेथे तपासणी करून कदम यांच्या आजाराबाबत शस्त्रक्रीया करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याप्रकरणी आम्ही चौकशीला सुरूवात केली असल्याचे उपायुक्त (परिमंडळ-3) अखिलेश सिंग यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.