बनावट बांधकाम परवाना देणारे "रॅकेट' उघड 

बनावट बांधकाम परवाना देणारे "रॅकेट' उघड 

सांगली - महापालिकेतून बनावट बांधकाम परवाना देणाऱ्या "रॅकेट'चा अखेर पर्दाफाश झाला. कार्पोरेशन बॅंकेने परवाना पडताळणीसाठी सहा महिन्यांपूर्वी पत्र पाठवले. बनावटगिरी उघड होऊनही महापालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले नव्हते. उशिराने जागे होत सांगली, कुपवाड परिसरातील सहा जागा मालकांवर शनिवारी (ता.8) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले. अद्याप अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. पोलिसांनी चार जागा मालकांना अटक केली. तर महिलेसह दोघे फरारी झाले आहेत. टोळीने महापालिकेबरोबर बॅंकेचीदेखील फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

संजयनगर पोलिसांनी अशोक भूपाल राजोबा (शारदा हौसिंग सोसायटी), झाकीर हुसेन मुजावर (कुपवाड), राजकुमार शिवदास राठोड (अभयनगर) याला, तर सांगली शहर पोलिसांनी अमोल यमनाप्पा जैनावर (वय 28, शाहूनगर, शामरावनगर) याला अटक केली. चौघांना दोन दिवस पोलिस कोठडीचा आदेश दिला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात अमित बाळू शिंदे (चांदणी चौक) याच्यावर, शहर पोलिस ठाण्यात मोरम्मा श्रीशैल मानशेट्टी (शामरावनगर, ज्ञानेश्‍वर कॉलनी) या महिलेवरही गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना उशिरापर्यंत अटक झाली नव्हती. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सांगलीतील शिवाजीनगरमधील कार्पोरेशन बॅंकेत घरकर्जासाठी दाखल प्रस्तावासोबत जोडलेले बांधकाम परवाने बनावट असल्याची शंका अधिकाऱ्यांना आली. हे प्रमाणपत्र, त्यावरील सही, शिक्‍का अधिकृत आहे काय? अशी विचारणा बॅंकेने पत्राद्वारे महापालिकेकडे केली होती. 26 सप्टेंबर 2016 ला बॅंकेने महापालिकेस पत्र पाठवले. अर्जाच्या अनुषंगाने महापालिकेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्डची तपासणी केली. तेव्हा पत्रे प्राप्त झालेल्या सहा जागा मालकांना कोणताही बांधकाम परवाना दिला नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच संबंधित सहाजणांनी बनावट परवाना व नकाशा तयार करून त्यावर नगररचनाकारांच्या खोट्या व बनावट सह्या केल्याचे निदर्शनास आले. महापालिकेची फसवणूक करताना संबंधित जागा मालकांनी बांधकाम परवाना फी देखील बुडवल्याचे स्पष्ट झाले. 

26 सप्टेंबरला बांधकाम परवाना पडताळणीसाठी पत्र आल्यानंतर तत्काळ रेकॉर्ड तपासण्यात आले. मात्र पाच महिने महापालिकेने गुन्हा नोंदवला नाही. त्यानंतर चार मार्च रोजी संबंधित जागा मालक आणि नकाशा तयार करणारे वास्तुविशारद, अभियंता यांना खुलासा करण्यास नोटीस बजावली. या नोटिशीला जागा मालक, नकाशा तयार करणाऱ्यांनी उत्तरच दिले नाही. त्यामुळे संबंधित जागा मालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानुसार बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी काल रात्री एकाच दिवशी संजयनगर, सांगली शहर आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. 

संजयनगर पोलिस ठाण्यात बांधकाम निरीक्षक शामराव दत्तात्रय गेजगे यांनी अशोक भूपाल राजोबा, झाकीरहुसेन मुजावर याच्याविरुद्ध, शाखा अभियंता वैभव भगवान वाघमारे यांनी राजकुमार शिवदास राठोडवर गुन्हा दाखल केला. विश्रामबाग पोलिस ठाण्यात अभियंता वाघमारे यांनी अमित बाळू शिंदे विरुद्ध फिर्याद दिली. तर शहर पोलिस ठाण्यात इमारत निरीक्षक दिलीप राजाराम कोळी यांनी अमोल यमनाप्पा जैनावर व मोरम्मा श्रीशैल मानशेट्टी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजोबा, मुजावर, राठोड, जैनावर या चौघांना अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा दोन दिवस पोलिस कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला. 

परवाना घेऊन बंगला बांधला 
अमोल जैनावर याने बनावट बांधकाम परवान्याच्या आधारे कार्पोरेशन बॅंकेत कर्ज प्रस्ताव दाखल करून लाखो रुपयांचे कर्ज मिळवले. त्यानंतर जागेवर बंगलाही बांधला आहे. तोपर्यंत महापालिकेला समजले देखील नाही. बॅंकेने परवाना पडताळणीसाठी अर्ज केल्यानंतरच खरा प्रकार उघडकीस आला. 

अन्य बॅंकांचे काय? 
कार्पोरेशन बॅंकेत दाखल झालेल्या कर्जप्रकरणात सहा बांधकाम परवाने बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील इतर राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि व्यापारी बॅंकांमध्येही अनेक जागा मालकांनी बनावट बांधकाम परवाने दाखल करून कर्जे उचलल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महापालिका आणि बॅंकांच्या फसवणुकीची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

अधिकाऱ्यांचा सहभाग 
महापालिकेतील बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहभागाशिवाय बनावट बांधकाम परवाना काढणे शक्‍यच नाही. महापालिकेने पहिल्या टप्प्यात जागा मालकांवरच गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस तपासात अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग निष्पन्न होईल. त्यामुळे तपास खोलवर करण्याची आवश्‍यकता आहे. 

लाखो रुपये बुडवले 
बांधकाम परवाना काढण्यासाठी महापालिकेत वारंवार हेलपाटे घालावे लागतात. अनेकदा फायली गहाळ होतात. त्यामुळे ही झंझटच नको म्हणून बनावट परवाना देणारी टोळीच कार्यरत झाली. या टोळीने जागा मालकांकडून परस्पर पैसे घेऊन बनावट परवाने दिले. त्यातून महापालिकेचे लाखो रुपये बुडाले आहेत. बनावट प्रमाणपत्र घेऊन बांधकामे करणाऱ्या मालकांवर महापालिका कोणती कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com