महावितरणने उडवली शेतकऱ्यांची झोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

मध्यरात्री दोन वाजता वीजपुरवठा सुरू
 

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झोप महावितरणने उडविली आहे. शेतीपंपाला मध्यरात्री दोन वाजता वीजपुरवठा सुरू केला जातो. त्यामुळे पंप सुरू करण्यासाठी मध्यरात्री शेतकऱ्याला झोपमोड करून शेतामध्ये जावे लागत आहे. पूर्वी दहा तास दिली जाणारी वीज आता आठ तासांवर आणली आहे.

राज्यातील मागील तीन-चार दिवसांपासून विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. विजेच्या पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने महावितरणने भारनियमनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शेतीपंपासाठी यापूर्वी रात्री सव्वा दहा ते सकाळी सव्वा आठ व सकाळी सव्वा आठ ते दुपारी सव्वा चार अशा वेळांमध्ये वीजपुरवठा केला जात होता.

रात्रीच्या वेळेला वीजपुरवठा करताना तो दहा तास केला जात असे. दिवसा वीजपुरवठा करताना आठ तास केला जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15-20 दिवसांपूर्वी "मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमात शेतीसाठी बारा तास वीजपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी महावितरणने दहा तासावरील वीजपुरवठा आठ तासांवर आणला आहे. मात्र, आता रात्री व दिवसा अशा दोन्ही वेळी आठ तासच वीजपुरवठा शेतीपंपासाठी केला जात आहे.