हो! मतदान झाले अपक्षास; मत गेले भाजपलाच: बुलडाणा जिल्हाधिकारी

वृत्तसंस्था
रविवार, 23 जुलै 2017

बुलडाणा जिल्ह्यातील सुलतानपूर गावामधील एका मतदान केंद्रावर झोरे यांना मतदान केले असताही यंत्रावरील भाजपच्या उमेदवाराच्याच नावासमोरील "एलईडी लाईट' चमकत असल्याचे स्पष्ट झाले होते. बुलडाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगास लिहिलेल्या पत्रामध्ये अशा स्वरुपाचा प्रकार घडल्याची कबुली दिली आहे

बुलडाणा - महाराष्ट्र राज्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या एका इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग यंत्रामध्ये (ईव्हीएम) अपक्ष उमेदवाराला मतदान केले जात असतानाही भारतीय जनता पक्षासच (भाजप) मत जात असल्याचे बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालामध्ये मान्य करण्यात आले आहे.

या प्रकरणी आशा अरुण झोरे या अपक्ष उमेदवाराकडून तक्रार नोंदविण्यात आली होती. झोरे यांना मतदान केले तरीही मत "काही वेळा' भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवारासच जात असल्याचे झोरे यांनी तक्रारीत म्हटले होते. झोरे यांच्या या तक्रारीसंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या अधिकारांतर्गत बुलडाणा जिल्हा अधिकाऱ्याकडून माहिती मागविली होती.

बुलडाणा जिल्ह्यातील सुलतानपूर गावामधील एका मतदान केंद्रावर झोरे यांना मतदान केले असताही यंत्रावरील भाजपच्या उमेदवाराच्याच नावासमोरील "एलईडी लाईट' चमकत असल्याचे स्पष्ट झाले होते. बुलडाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगास लिहिलेल्या पत्रामध्ये अशा स्वरुपाचा प्रकार घडल्याची कबुली दिली आहे. अपक्ष उमेदवारास मत दिले असताही भाजपलाच मतदान होत असल्याच्या या प्रकारामागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

"तांत्रिक बिघाडामुळे असे घडले असावे. जिल्हा परिषद निवडणुकीत सरासरी 60 जागांसाठी मतदान होते. ही समस्या एका विशिष्ट मतदारसंघामधील एका केंद्रामधील एका यंत्रासंदर्भातच आढळून आली. या प्रकरणी मतदान यंत्रात छेडछाड करण्यात आली असती; तर इतर केंद्रांवरील यंत्रांसंदर्भातही अशाच स्वरुपाच्या तक्रारी आढळून आल्या असत्या,'' असे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱयांकडून देण्यात आलेल्या या कबुलीचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.