परदेशी पक्ष्यांचे भरले संमेलन

नाशिक - नांदूरमध्यमेश्‍वर येथील पक्षी अभयारण्यात विदेशी पक्ष्यांच्या हजेरीने तयार झालेले नयनरम्य दृश्‍य.
नाशिक - नांदूरमध्यमेश्‍वर येथील पक्षी अभयारण्यात विदेशी पक्ष्यांच्या हजेरीने तयार झालेले नयनरम्य दृश्‍य.
महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण कमी झाले असले, तरीही चांगल्या पर्जन्यमानामुळे परदेशी पाहुण्यांचा मुक्काम अभयारण्यांसह जलाशयांच्या स्थळी यंदा वाढला आहे. त्यांच्या पक्षी मेळ्यांनी निसर्गाचे लावण्य खुलले आहे. विशेष म्हणजे, शहरी भागापासून दूर राहणाऱ्या रोहित पक्ष्यांनी (फ्लेमिंगो) शहरी भागात दर्शन घडवल्याने पक्षिप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. राज्यभरातील पक्ष्यांच्या संमेलनाचा "सकाळ'च्या बातमीदारांनी घेतलेला हा आढावा.

राज्याचे "भरतपूर' बहरले
महाराष्ट्राचे "भरतपूर' म्हणून प्रसिद्ध असलेले नांदूरमध्यमेश्‍वरचे (जि. नाशिक) पक्षी अभयारण्य परदेशी पक्ष्यांनी गजबजले आहे. फ्लेमिंगोसह चाळीसहून अधिक प्रजातींचे पक्षी निसर्गाचे सौंदर्य वाढविताहेत. तीस हजारहून अधिक पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षिप्रेमींचीही मोठी गर्दी होते आहे. संक्रांतीनंतर वातावरणातील गारवा कमी झाला असला, तरी अद्याप पक्ष्यांची विक्रमी हजेरी आहे. येथे फ्लेमिंगो हे पक्षी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. रेड क्‍लस्टर, पांचाल, शॉवलर, गार्गनी, लिटील ग्रेव्ह, गडवाल, युरेशियन व्हिजन, कॉमन टिल्ट, पेंटेड स्टॉर्क, व्हाइट स्टॉर्क, ब्लॅक ऍण्ड व्हाइट आयबिज, मार्श हेरिअर, स्टॉवेल ईगल, शोल्डर काईट, शिकरा, कॉटन कुट, पर्पल हेरॉन, ऑस्प्रे, ग्रे हेरॉन, युरेशियम करी लिव्ह, रिंग प्लॉवर आदी प्रजातींचे पक्षी इथे आहेत.

अधिवास संरक्षणाची अपेक्षा
पुणे- सोलापूर मार्गावरील भिगवण हा स्थलांतरित पक्ष्यांसाठीचा "हॉट स्पॉट'. जवळपास दोनशेहून अधिक प्रजातींचे पक्षी येथील जलाशयात पाहायला मिळतात. शहरी भागापासून दूर अंतरावर वास्तव्य करणारा फ्लेमिंगो या वर्षी प्रथमच पुण्यातील येरवडा, औंध भागात दिसला. या पक्ष्यांची एक जोडी अगदी शहराजवळ आढळल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात. टेकड्यांवरील खाणींमध्येही ब्राह्मणी बदक, शेकाट्या यांचे जणू संमेलनच भरले आहे. ग्रे हेरॉन, कॉमन टेल, करड्या रंगाचे डोके असणारी टिटवी, स्पून बिल, ग्रेटर स्पॉटेड ईगल, युरिशयन पूट यांचे आगमन झाले. पाणवठ्यांबरोबरच जंगल परिसर, माळरान येथेही स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे. या पक्ष्यांचा अधिवास संरक्षित व्हावा, यासाठी फारसे प्रयत्न होत नसल्याची खंत पक्षी अभ्यासकांची आहे.

पाणभिंगरीचे थवे अन्‌ आकर्षक उड्डाणे
पैठणच्या जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयावर हजारो विदेशी आणि देशी पक्षी आले आहेत. यंदा पाणी जास्त असल्याने पक्षी उशिरापर्यंत येथे राहतील. मराठवाड्यातील विविध जलाशयांवर भरलेला पक्ष्यांचा मेळा पक्षिप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरला आहे. तिबेट, रशिया, सैबेरिया, दक्षिण आफ्रिका, इराण, अमेरिकेसह हिमालय आणि भारताच्या विविध भागांतून पाहुण्या पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. या परिसरात जैवविविधता आणि मुबलक खाद्य असल्यामुळे स्थलांतरित पक्षी वास्तव्यास येतात. पाणभिंगरीचे थवे आणि त्यांची आकर्षक उड्डाणे आकाश आच्छादून टाकतात. सोनेवाडीजवळील निरीक्षण मनोऱ्यासह जायकवाडी, ब्रह्मगव्हाण, पैठण, कावसान येथून देखणा पट्टाकदंब, रोहित, पाणकावळा, भारद्वाज, व्हाईट ब्रेस्टेड वॉटरहेन, जांभळी पाणकोंबडी, ब्लॅक विंग स्टिल्ट, सॅंडपायपर, नदीसुरय, शिक्रा, वेडा राघू, नीलपंख, कोतवाल, खाटिक, पर्पल सनबर्ड, सुगरण, धोबी, लालबुडी बुलबूल, सातभाई, गुलाबी मैना, मार्श हॅरियर, कापशी घार, रंगीत करकोचा, कांडेसर करकोचा, स्पूनबिल, व्हाइट आयबीज, ब्लॅक आयबीज, ग्लॉसी आयबीज, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, तसेच बदकांमध्ये शॉवेलर, स्पॉट बील डक, गोल्डन डक अर्थात चक्रवाक, कॉमन टिल, कूट, रेड क्रेस्टेड पोचार्ड, गढवाल हे पक्षीही आढळून येतात.

रानपक्ष्यांची किलबिल
विदर्भ हे देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आवडते ठिकाण. यंदा वाढलेल्या थंडीमुळे पक्ष्यांची गर्दी सर्वच तलावांवर आहे. यामुळे पक्षिप्रेमींची पावले निरीक्षणासाठी पाणवठ्याकडे वळत आहेत. मात्र, नागपूर जिल्ह्यातील तेल्हारा तलाव, वडगाव, खापरी, पारडगाव भागातील तलावांवर पाणी नसल्याने स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी झाली. थंडीने उशिरा हजेरी लावल्याने यंदा विदेशी पक्ष्यांचे उशिरा आगमन झाले. सोन टिटवा, तणई, काळ्या पोटाचा सूरय, राजहंस, गजरा, परी, सरग, चिमण शेंद्य्रा, मोंटेग्यूचा भोवत्या, लहान रेव टिटवा, पाणटिवळा, मोठा पाणलावा, छोटा टिवळा, जलरंक, तपकिरी डोक्‍याचा कुरव, पल्लासची केगो, गंगा पाणलावा, शेंडी बदक यांचे अमरावती जिल्ह्यातील नलदमयंती सागर, केकतपूर, दस्तापूर, शेवती, सूर्यगंगा, घातखेड, पोहरा, मालखेड, सावंगा, इंदला, राजुरा व छत्री अशा 54 जलाशयांत दर्शन झाले. मेळघाट आणि पोहरा मालखेड राखीव जंगल परिसरात कृष्ण थीरथिरा, नीलय, निलांग चाष, राखी डोक्‍याची लिटकुरी, वरटी पाखरू हे रानपक्षी दिसले.

खानदेशात फ्लेमिंगोचे दर्शन
जळगाव जिल्ह्यातील हतनूर, बेलगंगा डॅम, हिवरा, बहुळा, जुनोने, सुकी धरण, भोकरबारी, पिंपळगाव हरेश्‍वरचा तलाव, शेवगा धरण, भाटी तलाव या भागात सैबेरियामधील 20 प्रकारचे पक्षी आढळतात. दोन दिवसांपूर्वी जुनोने धरणात पक्षी निरीक्षकांना "फ्लेमिंगो'चे दर्शन घडले. ब्राह्मणी डक, पट्ट कादंब (हंस), तलवार बदक, युरेशियन व्हिजन (वारकरी), थापड्या, चक्रांग, शेंडी बदक, लालपरी, नयनपरी, कॉमन पोचार्ड अशा बदकांचा विहार येथे असतो.

खाडीकिनाऱ्याचे वैभव
निसर्गसंपन्न रत्नागिरी जिल्ह्यात गोवळकोटपासून दाभोळपर्यंतच्या विस्तीर्ण खाडीकिनारी स्थलांतरित पक्षी येतात. पक्षी निरीक्षक अनिकेत कासेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लाल सरी, बदक, कलहंस बदक, ढबवा, पिटेल, लिटल ग्रेब, पायपर (छोटी तुतवार), लिटिल स्टिंट, कोम्बच डक, ग्रीन बी इटर, गुज, लेसर विलसिंग डक, कॉमन डिले, राखीव बगळा यांचा त्यांत समावेश असतो. निसर्ग संतुलनात हे पक्षी महत्त्वाची भूमिका बजावतात. जलक्रीडा करणाऱ्या विदेशी पक्ष्यांचा थवाही पाहायला मिळतो. मोचेमाड येथील किनाऱ्यावर सध्या लाखो सीगल विसावले आहेत.

हिमालय - लडाखमधील पक्षी
कोल्हापुरात वैभवातील एक समृद्ध रंकाळा, कळंबा, राजाराम तलाव, न्यू पॅलेसच्या जलाशय परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची हजेरी मोहून टाकते. हिमालय, लडाख अन्‌ परदेशातून हे पक्षी येथे आले आहेत. पर्यावरणप्रेमी सुहास वायंगणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राखी धोबी, पिवळा धोबी, धोबी या पक्ष्यांची रेलचेल आहे. छोटा पाणकावळा, चित्रबलाक, जांभळी पाणकोंबडी, पाणडुबी, राखी बदक, नदी सूरय, राखी बगळा, उघड्या चोचीचा करकोचा, धीवर, कवड्या धीवर, चमचा, जांभळा बगळा, रात बगळा, लहान बगळा, गाय बगळा, काळा शराटी, शेकाट्या, पांढरा शराटी आदी पक्ष्यांचा संमेलनात समावेश आहे. शिकारी पक्ष्यांमध्ये दलदल ससाणा आणि ओस्प्रे या पक्ष्यांची नोंद कळंबा तलावावर झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com