जाळरेषा निधीला सरकारचीच कात्री

Forest-Fire
Forest-Fire

वन विभागाचे प्रयत्न पडताहेत अपुरे, लोकप्रबोधन गरजेचे
नागपूर - राज्यातील जंगलांना आगीच्या घटना वाढत असताना सरकारने वनवणवा प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या निधीत कपात केली आहे. त्यामुळे जाळरेषांची कामे झालेली नाहीत. उन्हाळ्यात वनवणवा लागल्यास त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, असा प्रश्‍न वनाधिकाऱ्यांना भेडसावत आहे. 

वनांचे आगीपासून संरक्षणासाठी उन्हाळ्यापूर्वी वनवणना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येतात. त्यानुसार, १५ फेब्रुवारीपूर्वी जाळरेषा बनवणे अपेक्षित असते. 

विदर्भात या वर्षी जंगलामध्ये पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले. मात्र वनवणव्यावर नियंत्रणासाठी निधीच नसल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसमोर आव्हान आहे. राज्यात गेल्या वर्षी नऊ महिन्यांत पाच वर्षांतील सर्वाधिक, ५५८० आगीच्या घटना घडल्या. यात गडचिरोली, नागपूर आणि ठाणे क्षेत्रांत सर्वाधिक आगी लागल्याचे आकडेवारीवरून दिसते. जंगलातील आगींवर नियंत्रणासाठी आतापर्यंत १२७६ पोर्टेबल फायर ब्लोअर वनविभागाने खरेदी केले. त्यांच्या खरेदीचा प्रस्ताव वनविभागाने सरकारकडे पाठविला. मात्र केंद्र सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील निधी न मिळाल्याने तो थंडबस्त्यात आहे. 

तंत्रज्ञानाचीदेखील मदत 
आगाची माहिती तातडीने वन विभागाला मिळावी म्हणून भारतीय वन विभागामार्फत त्या-त्या क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांना उपग्रहामार्फत आगीची माहिती देण्यात येत आहे. याकरिता त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांची नोंद भारतीय वन कार्यालयात करण्यात आली आहे.

मानवी चुकांमुळे आगी 
जळगाव - जिल्ह्यासह खानदेशातील सातपुड्याच्या पर्वतराजीत जंगलक्षेत्र आहे. गेल्याच महिन्यात पाटणादेवी (ता. चाळीसगाव) वनक्षेत्रात मोठा वणवा पेटला होता. ३० ते ३५ हेक्‍टर वनक्षेत्राला झळा पोचल्या. दरवर्षी पाटणादेवी, पाचोरा-जामनेर, यावल तसेच मुक्ताईनगर तालुक्‍यातील वनक्षेत्रात वणवे पेटतात. खरीप हंगामपूर्व तयारीसाठी शेतकरीही शेत तयार करताना सभोवतालचा कचरा जाळतात. जंगलात फिरणाऱ्यांकडून विडी-सिगारेट फेकल्याने आगी भडकतात. त्यामुळे लोकांचे प्रबोधन गरजेचे आहे. प्रत्यक्षात अपुरे कर्मचारी आणि विभागाच्या उदासीनतेमुळेही आगी रोखण्यात अपयश येतेय. आगीवर मात करण्यासाठी चर खोदणे, बंबांना पाचारण करून आग रोखण्याचे प्रयत्न करतो, मात्र त्यांना मर्यादा येतात, असे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी सांगितले.

डोंगरकपारीत कसरतच
कोल्हापूर - जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांत घनदाट जंगल आहे. त्यांमधून सहा राज्य, तसेच एक महामार्ग जातो. जंगलांना लागून गावांतर्गत धनगरवाडे तसेच खासगी मालकीच्याही जागा आहेत. तेथे दरवर्षी वणवे लागतात, यंदाही वणवे लागले. गावांशेजारचे वणवे आटोक्‍यात आणले जातात; पण डोंगर कपारीतील गवतांमधून लागलेले वणवे विझवणे अवघड बनते. तेथे पाणी नेणेही शक्‍य नसते. वनरक्षक, वनपाल, ग्रामस्थ झाडांच्या फांद्यांनी वणवे शांत करतात. तरीही दोन-तीन दिवस धुमसतात, नुकसान होते. 

हजारो हेक्‍टर क्षेत्र खाक 
नाशिक - येथील वनवृत्तामध्ये जानेवारी ते १५ मेअखेर हजारो एकर क्षेत्र खाक झाले आहे. त्याला रोखण्यासाठी वनविभाग उपाययोजना करते, मात्र मनुष्यबळाअभावी नुकसान रोखणे मुश्‍कील बनते. वनविभागाकडून फायरवॉच, अधिकाऱ्यांच्या नियमित गस्ती, आग लागताच माहिती मिळवून उपाययोजनांचे प्रयत्न होतात. ३१ मार्चअखेर नाशिक वनवृत्तामध्ये आगीच्या २२७ घटना घडल्या, यात ७६०.१५ हेक्‍टर क्षेत्र; तर नगर वनक्षेत्रात ९४ घटनांमध्ये ३३६.५० हेक्‍टर क्षेत्र खाक झाले.

गेल्या वर्षी आगीच्या घटना - ५५८०
जंगलाची हानी ३१,0७४ हेक्‍टर

वन विभागाने आवश्‍यक असलेल्या सर्वच वनवृत्तांना निधीचे वाटप केलेले आहे. निधीची अडचण नाही. 
- नितीन काकोडकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com