दहा मिनिटे झुंजले नि बिबट्याला नमविले! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

लिंगदेव - जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परबत नाईकवाडी यांच्यावर आज सकाळी बिबट्याने हल्ला केला. त्यांनी तब्बल 10 मिनिटे जिगरबाज झुंज देऊन बिबट्याला पळवून लावले. जखमी नाईकवाडी यांना आधी अकोल्यातील व नंतर नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

लिंगदेव - जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परबत नाईकवाडी यांच्यावर आज सकाळी बिबट्याने हल्ला केला. त्यांनी तब्बल 10 मिनिटे जिगरबाज झुंज देऊन बिबट्याला पळवून लावले. जखमी नाईकवाडी यांना आधी अकोल्यातील व नंतर नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

गर्दनी (ता. अकोले) येथे हा थरार घडला. पिकाला पाणी पोचले की नाही, हे पाहण्यासाठी नाईकवाडी सकाळी सहाच्या सुमारास घरापासून जवळ असलेल्या शेतात गेले. उसात बसलेल्या बिबट्याने पाठीमागून झेप घेतल्यामुळे नाईकवाडी खाली पडले. बिबट्याने त्यांचे डोके जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाईकवाडी यांनी प्रसंगावधान राखून खांद्यावरून पुढे आलेले बिबट्याचे दोन्ही पाय पकडून त्याला डोक्‍यावरून उचलून पुढे आपटले. त्यामुळे बिबट्या आणखी चवताळला. त्याने समोरून हल्ला चढविला. तेवढ्या अल्प काळातही सावरण्याचा प्रयत्न करत नाईकवाडी यांनी प्रतिकार केला. धावून आलेल्या बिबट्याच्या थेट बचाळीत हात घालीत सर्व शक्ती एकवटून त्यांनी बिबट्याच्या पोटावर लाथेचा जोरदार प्रहार केला. यात बिबट्या सात-आठ फूट लांब जाऊन पडला. 

या हल्ल्यात या काळात नाईकवाडी यांच्या डोक्‍यातून रक्ताची धार लागली. डाव्या हाताच्या एका बोटाला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यांना भोवळ आल्यासारखे वाटले. बिबट्या मात्र पुन्हा चाल करून येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून त्यांनी बसल्या जागेवरून एका हाताने त्याच्यावर माती फेकली. बिबट्या सात-आठ-फुटांवर थांबला. नाईकवाडी उठण्याचा प्रयत्न करू लागताच तो गुरगुरत पुढे येण्याचा प्रयत्न करी. बसल्या बसल्या मागे सरकत नाईकवाडी यांनी त्याच्यावर माती फेकणे सुरूच ठेवले. त्यांच्यातील अंतर वाढू लागले. मिनिटभरानंतर बिबट्या निघून गेला अन नाईकवाडी कसेबसे उठून उभे राहिले आणि घराकडे निघाले. मात्र डोक्‍यातून, बोटातून सक्तस्राव सुरू झाला होता. समोरच काही अंतरावर दिसणाऱ्या घरातील कुटुंबीयांना मोबाईलवरून त्यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली. 

नाईकवाडी यांना लगेच अकोल्यातील रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या डोक्‍याला बिबट्याच्या दातांमुळे मोठी जखम झाली असून 10-12 टाके पडले आहेत. दोन्ही हातांनाही मोठ्या जखमा झाल्या आहेत. छाती आणि पाठीला मार लागला आहे. प्रथमोपचारानंतर त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांचे चिरंजीव श्रीकांत यांनी "सकाळ'ला सांगितले. 

बिबट्याची भीती वाटत नसल्यामुळेच! 
नाईकवाडी यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी समजताच अकोल्यातील रुग्णालयात कार्यकर्त्यांची व नातेवाइकांची गर्दी झाली. बिबट्याशी झुंजणाऱ्या नाईकवाडी यांचे कौतुक होत होते. त्यांचे चिरंजीव श्रीकांत म्हणाले, ""दुसरा कुणीही असता, तरी बिबट्यापुढे टिकाव धरू शकला नसता. पप्पांनी (नाईकवाडी) शेतात अनेकदा बिबटे पाहिले. अगदी दोन दिवसांपूर्वीही त्यांनी एकाच वेळी दोन बिबटे जवळून पाहिले. त्यामुळे बिबट्या अचानक दिसल्यावर वाटणारी भीती त्यांच्या मनात नव्हती. तशी असती, तर ते झुंज देण्यास सज्ज झालेच नसते. मनात भीती नसली, की कोणत्याही संघर्षात विजय मिळविण्याची क्षमता प्राप्त होते, हेच यातून स्पष्ट होते.'' 

Web Title: The former member of the Zilla Parishad attacked

टॅग्स