यंदा पैशाऐवजी मोफत पुस्तकेच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

सोलापूर - "सर्व शिक्षा अभियाना'च्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. सरकारच्या पाच डिसेंबर 2016 च्या निर्णयान्वये त्या पुस्तकासाठीचे पैसे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, जून 2017 पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षासाठीच फक्त त्यात सूट देण्यात आली आहे. शाळांनी "झिरो बॅलन्स'ने विद्यार्थ्यांची खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेत काढण्याचा आदेश सरकारने दिला आहे. 

लाभाच्या वस्तूचे रोख पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय पाच डिसेंबरच्या शासन निर्णयान्वये झाला आहे, त्यामुळे शिक्षण विभागानेही त्याची तयारी म्हणून मोफत पाठ्यपुस्तकांसाठी पात्र शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांची खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेत काढून त्याला आधार जोडून घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या होत्या. दरम्यान, पुस्तकांचे पैसे खात्यावर जमा न करता थेट विद्यार्थ्यांना पहिल्यासारखी पुस्तके देण्याबाबतची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे "बालभारती'ने केली होती, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुस्तकासाठीचे पैसे खात्यावर जमा न करता पूर्वीप्रमाणे पुस्तकेच विद्यार्थ्यांना देण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे केवळ यंदाच्या शैक्षणिक वर्षात पुस्तकासाठीचे पैसे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात दिले जाणार नाहीत. 

हा निर्णय झाला असला तरी प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांचे खाते बॅंकेमध्ये काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2018-19 या शैक्षणिक वर्षापर्यंत सर्व विद्यार्थ्यांची बॅंकेमध्ये खाती असणे आवश्‍यक आहे. जेणेकरून त्या शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाचे पैसेही थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करता येणे शक्‍य होणार आहे. 2018-19 या वर्षापासून लाभाच्या वस्तूसंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय मोफत पाठ्यपुस्तक योजनेलाही लागू राहणार आहे. 

शिक्षकांचा सुटकेचा निःश्‍वास 
मोफत पाठ्यपुस्तकाचे पैसे या वर्षीपासूनच विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचा धसका शिक्षकांनी घेतला होता. कारण अद्यापही अनेक विद्यार्थ्यांची खाती बॅंकेमध्ये उघडलेली नाहीत. मात्र, सरकारने यंदाच्या वर्षी सूट दिल्यामुळे शिक्षकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षापर्यंत विद्यार्थ्यांची खाती उघडण्यास आता त्यांना वेळ मिळणार आहे. 

Web Title: Free books instead of money