एफटीआयआयने नाकारला रंगांधळेपणामुळे प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - रंगांधळेपणा असल्याने प्रवेश नाकारत असल्याचा फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा (एफटीआयआय) निर्णय कायम ठेवत उच्च न्यायालयाने आशुतोष गाला या विद्यार्थ्याला दिलासा देण्यास नकार दिला. 

मुंबई - रंगांधळेपणा असल्याने प्रवेश नाकारत असल्याचा फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा (एफटीआयआय) निर्णय कायम ठेवत उच्च न्यायालयाने आशुतोष गाला या विद्यार्थ्याला दिलासा देण्यास नकार दिला. 

संपादन क्षेत्रातील पदव्युत्तर प्रवेशिका (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एडिटिंग) या अभ्यासक्रमासाठी एफटीआयआयमध्ये प्रवेश घेण्याची आशुतोष गालाची इच्छा होती. मात्र, त्याचा प्रवेश अर्ज बाद ठरवल्याने त्याविरोधात आशुतोषने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अपंग व्यक्ती (समान संधी, हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) कायद्याच्या कलम 2(ब) चा आधार घेत, रंगांधळेपणा हा अंधत्व किंवा कमी दृष्टी या कलमात मोडत नसल्याने प्रवेश नाकारणे चुकीचे आहे, असे आशुतोषने याचिकेत म्हटले होते. संस्था चालवत असलेल्या प्रत्येक अभ्यासक्रमात रंगांधळेपणा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे निकष नाहीत, याकडे त्याने न्या. शंतनू खेमकर आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी निकषांत स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतचे निर्णय संस्था स्वतंत्रपणे घेतात, असा आरोपही याचिकेत होता. गेल्या वर्षी दोन विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचेही त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनाला आणून दिले होते. 

याचिकाकर्त्यांचे हे मुद्दे एफटीआयआयने खोडून काढले. या अभ्यासक्रमात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात निसर्ग, रंग, त्यांच्या विविध छटा, सौंदर्य, रंगसंगती याला प्राधान्य दिले आहे. एफटीआयआयची एक तज्ज्ञ समिती असून त्या समितीसमोर विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या अहवालावर प्रवेशनिश्‍चिती होते, असे एफटीआयआयने न्यायालयाच्या निदर्शनाला आणले. विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी या तज्ज्ञ समितीने काही नियम तयार केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्यावर एफटीआयआयचा हा युक्तिवाद मान्य करत तज्ज्ञ समितीच्या अहवालाविरोधात जाऊन विद्यार्थ्याला संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचे आदेश देणे कायद्याला धरून नाही, असे सांगत खंडपीठाने संबंधित विद्यार्थ्याने केलेले अपील फेटाळले. 

Web Title: FTII admission