संगीताचा सदाबहार उत्सव...

संगीताचा सदाबहार उत्सव...
संगीताचा सदाबहार उत्सव...

मास्टर दीनानाथ मंगेशकर, लता- आशा- उषा- हृदयनाथ मंगेशकर, मास्टर दत्ताराम, पं. जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, ज्योत्स्ना भोळे, प्रसाद सावकार ही आणि यांच्यासारखी अनेक स्वररत्ने गोमंतभूमीने जगाला दिली. या भूमीत सतत कुठं ना कुठं तरी स्वर- तालाचा सुरेल उत्सव साजरा होत असतो. असाच एक उत्सव म्हणजे गिरिजाताई केळेकर संगीत संमेलन. गिरिजाताई म्हणजे गायनाच्या विश्वातलं एक तपस्वी व्यक्तित्व. केळेकर हे घराणंच संगीताला वाहून घेतलेलं. सारं आयुष्य संगीत कलेला अर्पण केलेल्या गिरिजाताईंनी गोव्याच्या सांगीतिक विश्वाला सोन्याचा कळस चढवलेला आहे. त्यांचं अवघं आयुष्य हे तपःपूत होतं. ज्योत्स्ना भोळे या त्यांच्या भगिनी आणि आजच्या ख्यातनाम गायिका देवकी पंडित यांच्या त्या आजी. गिरिजाताई 1903 मध्ये बांदिवडे या गावात जन्मल्या. आजी सरस्वतीबाई यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे गिरवले.

"बांदिवड्याच्या महालक्ष्मी मंदिरात सतत निनादत असलेली घंटा ऐकून मला बालपणीच नादाचा नाद लागला, संगीताची ओढ निर्माण झाली'' असं गिरिजाताईंनी म्हटल्याचं जुन्या लोकांनी नोंदवलंय. गाण्याचा ध्यास लागलेल्या गिरिजाताईंनी नागेशीमधल्या रामकृष्णबुवा पझे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. ही सगळी चौदा भावंडे. तीन भाऊ आणि अकरा बहिणी. गिरिजाताईंसह ज्योत्स्नाताई, केशरबाई बांदोडकर, मंगला रानडे, नमिता खांडेपारकर ह्या पाच बहिणींनी गायनात चांगलं नाव मिळवलं. गिरिजाताई 22 व्या वर्षी गाणं शिकण्यासठी मुंबईला गेल्या. आगरा घराण्याचे थोर गायक विलायत हुसेन खॉंसाहेब यांच्याकडे त्या शिकल्या. त्यांचा एक भाऊ रामा हा दिलरुबा, शहनाई, तबला अशा विविध वाद्यांच्या वादनात तरबेज होता. पण अल्पवयातच- अवघ्या 19व्या वर्षी तो हे जग सोडून गेला. मुंबईत गिरिजाताईंनी रेडिओस्टार्स नावाच्या नाटक मंडळीत अभिनय आणि गायन केलं. याच नाट्यमंडळीत हिराबाई बडोदेकर आणि त्यांच्या बहिणीही गायकनटी म्हणून काम करत होत्या. मुंबईत खासगी नभोवाणीत काही वर्षं त्यांनी गायन केलं. त्यानंतर त्या गोव्याला परतल्या आणि अखेरपर्यंत गोव्यातच त्यांचं वास्तव्य होतं. जितेंद्र अभिषेकी आपलं पहिलं गाणं गिरिजाताईंकडे शिकले. बकुळाबाई रामनाथकर, अजित कडकडे, रघुनाथ नमशीकर इत्यादी त्यांचे नामवंत शिष्य होत. गिरिजाताई 1982 मध्ये गेल्या. त्यानंतर काही वर्षं गेली. 1989 पासून त्यांच्या नावानं हे संगीत संमेलन फोंड्यात सुरू झालं.

पत्रकारिता आणि संगीत क्षेत्र यांचा समन्वय तसा विरळाच असतो. मात्र गोव्यातील फोंड्यात फर्मागुढी येथे भरणाऱ्या स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळेकर स्मृती संगीत संमेलनातून हा निकटचा संबंध प्रकर्षाने समोर आला असून पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरत असणाऱ्या संगीतप्रेमींनी संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या पेशकशीचा स्वरानंद कलाप्रेमींना दिला आहे. फोंडा पत्रकार संघ हा स्वरतालाचा सोहळा आयोजित करीत आलेला आहे. आपल्या गायन शैलीनं रसिकांना मोहिनी घातलेल्या आणि गोव्याचं नाव जगभर केलेल्या स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळेकर यांची स्मृती जपण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाला संगीतप्रेमी आणि संगीत रसिकांबरोबरच संगीत कलाकारांनीही तेवढीच जोरकस दाद दिल्यानं यंदाचं हे अठ्ठाविसावं गिरिजाताई केळेकर संगीत संमेलन येत्या शनिवारी 10 व रविवारी 11 असे फर्मागुढीच्या गोपाळ गणपतीच्या प्रांगणात दिमाखात साकारत आहे. गिरिजाताई केळेकर यांची स्मृती जपण्याचा फोंडा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोकुळदास मुळवी यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद तर आहेच, पण पत्रकारिता क्षेत्रात राहूनही सांगीतिक कलेला वाव आणि प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाचे कौतुक करणे क्रमप्राप्त ठरते. गिरिजाताई केळेकर यांनी प्रतिकूल परिस्थिती असतानाही संगीत कलेची साधना केली. अशा गानतपस्विनीची आठवण पत्रकार संघानं ठेवली हे या संगीत संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.

गोपाळ गणपतीच्या पवित्र प्रांगणात 2 डिसेंबर 1989 ला पहिले संगीत संमेलन साकारले गेले. गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि गोपाळ गणपती देवस्थानच्या अध्यक्ष कलासक्त श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांनी हे संगीत संमेलन आयोजित करण्यास फोंडा पत्रकार संघाला दिलेले सहकार्य उल्लेखनीय असेच आहे. शशिकलाताई आणि त्यावेळच्या फोंडा महालातील संगीतप्रेमींनी दिलेल्या सहकार्यामुळेच हे संगीत संमेलन आकाराला आले, असे गोकुळदास मुळवी विनयाने म्हणतात. पहिल्या संगीत संमेलनाचे उद्‌घाटन नागेशी - बांदोड्याचे सौंदेकर घराण्याचे श्रीमंत राजे सदाशिवराव वडियार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर या संगीत संमेलनाची व्याप्ती वाढतच राहिली. या संगीत संमेलनात देशातील नामवंत गायक वादकांबरोबरच गोमंतकीय कलाकारांना आपल्या गायनवादनाची पेशकश करण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करुन दिली, यातच या संगीत संमेलनाचे मोठेपण कळून चुकते. दोन दिवसीय या संगीत संमेलनात प्रसिद्ध गायक वादकांची पेशकश आणि त्यानंतर समारोप सोहळ्यात नाट्य संगीत रजनीची बहारदार पेशकश हे या संमेलनाचे स्वरूप आहे. ज्योत्स्नाताई भोळे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. ह्रदयनाथ मंगेशकर, उस्ताद झाकीर हुसेन, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. अजय पोहनकर, पं. राजा काळे, पं. अजय चक्रवर्ती, आचार्य गोकुलोत्सव महाराज, आरती अंकलीकर- टिकेकर, पं. राजन व साजन मिश्रा बंधू, शुभा मुदगल, देवकी पंडित अशा एकापेक्षा एक गाजलेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांबरोबरच उगवत्या, नव्या दमाच्या गोमंतकीय कलाकारांनाही या संगीत संमेलनाने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. प्रथितयश गोमंतकीय गायक वादक कलाकारांनीही आपल्या कला कौशल्याची चुणूक या संगीत संमेलनातून कानसेनांना दाखवून दिली आहे.

पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य रघुनाथ फडके यांनी तर आपल्या गुरुच्या स्मरणार्थ ठेवलेला पुरस्कार याच संगीत संमेलनातून दिला जातो. अन्य गोमंतकीय कलाकारांनाही या संगीत संमेलनातून गौरवले जाते. एकप्रकारे कलाकारांना व्यासपीठ देण्याबरोबरच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या या संगीत संमेलनाचं हे आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे. सुरवातीला संगीतप्रेमी आणि अंत्रुज महालातील सुह्रदांच्या सहकार्यानं हे संगीत संमेलन आयोजित करण्यात येत असलं तरी आता राज्य सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्यानं या संगीत संमेलनाचा यज्ञ अविरतपणे धगधगत आहे. या यज्ञात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक वादक कलाकारांनी टाकलेल्या आपल्या संगीतरूपी समिधांनी गोव्याचा हा परिसर संगीतमय करुन सोडला आहे. एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, पत्रकार संघातर्फे हे संगीत संमेलन आयोजित करण्यात आल्याने हे संमेलन काही काळच टिकेल, अशी अफवा काही हितशत्रूंनी पसरवली होती. मात्र ही अफवा या संगीत संमेलनाच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरली असून एकापेक्षा एक सरस कलाकारांची पेशकश या संगीत संमेलनातून होत असल्याने राज्यातील एक उत्कृष्ट असे संगीत संमेलन म्हणून नावाजले गेले आहे. विशेष म्हणजे या संगीत संमेलनाच्या उद्‌घाटनाला दैनिक "गोमन्तक'चे तत्कालीन संपादक नारायण आठवले यांनी उपस्थिती लावली होती. उद्‌घाटन झाल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात ""देवाच्या साक्षीने आणि देवाच्या सान्निध्यात कार्य करणारी माणसे या व्यासपीठावर उपलब्ध आहेत, म्हणूनच हे संगीत संमेलन अव्याहतपणे सुरूच राहील,'' असा आशीर्वाद दिला. उद्‌घाटनापूर्वी "हे संगीत संमेलन आणखी काही काळच चालणार आणि लवकरच बंद पडणार' अशी कुजबूज काहीजण करत असल्याचे नारायणराव आठवले यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी हे उद्‌गार काढले होते. त्यानंतर अठ्ठावीस वर्षे हे संमेलन अव्याहतपणे सुरू आहे.
सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या या पत्रकार संघाने संगीत संमेलनाचे हे शिवधनुष्य पेलण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याने आयोजकांना त्यासाठी शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com