"डिजिटायझेशन'ची वाटचाल अडखडतीच! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

राज्यातील काही ग्रंथालये, वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभली आहे. त्या अनुषंगाने काळानुरूप या ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाची कास धरली असून, त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. ही ग्रंथालये संपूर्णपणे डिजिटल होत नसली, तरी त्यांचे बरेच काम संगणकावर होऊ लागले आहे. अलीकडे "ई-साहित्य' नावाची संकल्पना विकसित होत चालल्याने काही ग्रंथालयांनी "ई-लायब्ररी' समृद्धीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थात ही प्रक्रिया दीर्घकालीन असली, तरी वाचकांनीही त्या दृष्टीने आपली वाचनासंदर्भातील मानसिकता तयार केली आहे. काही वाचनालये आपले अस्तित्व टिकवून असून, भविष्यातील बदल स्वीकारत सर्वार्थाने "डिजिटल' होत आहेत. 

खानदेशातील ग्रंथालयांचे संगणकावर कामकाज 
जळगाव :
जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत शतकोत्तरी परंपरा लाभलेली वाचनालये आहेत. जळगावात वल्लभदास वालजी वाचनालय, धुळ्यातील गरुड वाचनालय, तर नंदुरबारमधील लोकमान्य टिळक वाचनालयाचा लौकिक राज्यभर आहे. चाळीसगावसारख्या तालुकास्तरावरच्या शहरातही नुकताच अमृतमहोत्सव साजरे केलेले नारायणशेठ बंकट वाचनालय आहे. याशिवाय अन्य खासगी संस्थांनी चालवलेली व पालिकांची लहान-मोठी वाचनालयेही आहेत. ही वाचनालये पूर्णपणे डिजिटल झाली नसली, तरी बहुतांश ठिकाणी आता संगणकावर आधारित कामकाज चालते. पुस्तकांच्या नोंदीही संगणकावर घेतल्या जातात. 

डिजिटायझेशनसाठी हवे अनुदान 
नागपूर :
विदर्भात जवळपास दोन हजार दोनशे सार्वजनिक वाचनालये आहेत. ही वाचनालये राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून चालविली जातात. त्यांच्यावर जिल्हा ग्रंथालयाचे नियंत्रण असते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी या संदर्भात देखरेख करतात. मात्र, अद्याप एकही ग्रंथालय डिजिटल झाले नाही. अनुदानही तोकडे मिळत असल्याने त्यांच्यापुढे कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्च करणेच शक्‍य होत नाही. यामुळे इंटरनेट किंवा इतर सुविधा येथे देणे शक्‍य नाही. सरकारने ग्रंथालये डिजिटल करण्यासाठी वेगळा निधी उपलब्ध करून दिलेला नाही. या संदर्भात अनेक वर्षांपासून मागणी आहे. 

कोल्हापुरात प्रबंधांचे डिजिटायझेशन 
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाने तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेता ग्रंथपालसाठीच्या अभ्यासक्रमात इन्फॉर्मेशन पॅकेजिंग, इन्फॉर्मेशन एक्‍स्प्लोझन हे विषय समाविष्ट केले आहेत. 2012 च्या अभ्यासक्रमात या विषयांचा समावेश झाला. महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्‍टच्या अंमलबजावणीनंतर अधिकार मंडळे अस्तित्वात येऊन साधारण सप्टेंबरमध्ये पुन्हा अभ्यासक्रमात नवे विषय समाविष्ट केले जातील. विद्यापीठाने एकोणीस लाख रुपये अनुदानातून प्रबंधांचे डिजिटायझेशन केले आहे. ते "शोधगंगा'वर अपलोड केले आहेत. 

साताऱ्यात डिजिटायझेशन दूरच 
सातारा :
शतकोत्तर अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारे साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह नगर वाचनालय हे सातारा जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचा मानबिंदू आहे. ब्रिटीशकाळाच्या पूर्वार्धात 1853 मध्ये स्थापन झालेल्या या ग्रंथालयात एक लाख पस्तीस हजारांहून अधिक ग्रंथ आहेत. त्यातील सव्वादोन हजार ग्रंथ दुर्मिळ व अतिदुर्मिळ वर्गातील आहेत. ग्रंथालय चळवळीची दीर्घपरंपरा असूनही जिल्ह्यातील एकाही ग्रंथालयाचे डिजिटायझेशन झालेले नाही. 

मुंबईत वेग कमी 
मुंबई :
वाचकसंख्या कमी होतेय, अशी चिन्हे दिसू लगली तेव्हा काही ग्रंथालयांनी जाणीवपूर्वक आपल्या ग्रंथालयांत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये सभासद वाढविण्यासाठी शुल्कात डिस्काऊंट, वेगवेगळ्या वयोगटांसाठी खास मेंबरशिप, लहान मुलांसाठी वेगळा पुस्तक खजिना आदींचा समावेश आहे. जेव्हा ग्रंथालयांनी डिजिटल व्हायचे ठरविले तेव्हा मात्र हा वेगळा बदल होता. हळूहळू वाचक डिजिटल प्रणालीला स्वीकारू लागले. मुंबईत प्रामुख्याने दादर पूर्व नायगाव येथील ग्रंथालय आणि बोरिवली येथील शाखेत पुस्तकांच्या संगणकीकृत नोंदणीचे काम वेगात सुरू आहे. 

पुस्तक देवघेवीसाठी विशेष सॉफ्टवेअर 
नाशिक :
नाशिकमधील ग्रंथालयांची वाटचाल डिजिटायझेशनकडे सुरू झालेली आहे. आतापर्यंत पूर्ण डिजिटायझेशन झाले नसले, तरी आठ ते दहा ग्रंथालये त्यांची अनेक कामे संगणकावरच करतात. सार्वजनिक वाचनालयात पुस्तक देवघेव संगणकाद्वारेच होते. त्यासाठी "सोल' हे सॉफ्टवेअर वापरले जाते. याद्वारे पुस्तकांची देवघेव, सभासदांची नोंदणी, नव्या-जुन्या पुस्तकांची नोंदणी केली जाते. सभासदांना स्मार्ट कार्ड दिले आहे. त्यानुसार एका क्‍लिकवर सभासदांची सर्व माहिती उपलब्ध होते. 

सोलापुरात बदलाला सामोरे जाण्याचे प्रयत्न 
सोलापूर :
आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रंथालय क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. ग्रंथालयांचे संगणकीकरण, ई-साहित्य व पारंपरिक वाचन साहित्य यांची सांगड घालून संकरित (हायब्रीड) ग्रंथालये वाचकांच्या सेवेत रुजू आहेत. वाचन साहित्याचे स्वामित्व हक्क, आर्थिक बाबी, वाचकांचा कल अशा काही समस्या असल्याने पूर्णत: "डिजिटल ग्रंथालय' ही संकल्पना सध्या तरी आपल्याकडील सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रात साकारणे शक्‍य नाही. कोणताही बदल स्वीकारणे अवघड असते; परंतु अस्तित्व टिकविण्यासाठी बदलाला सामोरे गेले पाहिजे. डिजिटायझेशनमुळे दुर्मिळ साहित्य कायमस्वरूपी जतन करून ते अनेक वाचकांपर्यंत पोचविणे शक्‍य झाले आहे. 

अकोल्यात ग्रंथपाल बदलांपासून दूर 
अकोला ः
डिजिटायझेशनमुळे ग्रंथालय जगतात वेगाने आधुनिकीकरण होत आहे. परंतु अकोला जिल्ह्यात तूर्त एकही ग्रंथालय डिजिटल नाही. डिजिटल ग्रंथालयाच्या उपकेंद्राचे काम प्रगतिपथावर असले, तरी ग्रंथपालसाठीच्या अभ्यासक्रमात नवतंत्रज्ञान आणि त्याचा अवलंब याबाबत पूरक बदल होताना दिसत नाही. ग्रंथपाल प्रशिक्षणाचे जुनेच अभ्यासक्रम (बी. लिब्‌, एम. लिब्‌) असल्याने ग्रंथपाल तंत्रज्ञानाधारित बदलांपासून कोसोदूर आहेत. जुने, अत्यंत दुर्मिळ ग्रंथ किंवा दस्तऐवजांच्या डिजिटायझेशनमुळे वाचकांना ते सहज उपलब्ध होत असले, तरी शासकीय आणि अनुदानित ग्रंथालयांत डिजिटायझेशन झालेले नाही. 

Web Title: Global Librarian Day