राज्यात पेरण्यांना वेग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

पुणे - राज्यात सर्वत्र पर्जन्यवृष्टी होत असून, खरिपाच्या 64 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेली तीन वर्षे दुष्काळाला तोंड देणाऱ्या मराठवाड्यातही पेरण्यांना वेग आला असून, अन्य विभागांच्या तुलनेत तेथे जास्त पेरणी झाली आहे. 

राज्यात खरीप पिकाचे क्षेत्र 139 लाख 64 हजार हेक्‍टर असून, गेल्या आठवड्यापर्यंत 88 लाख 99 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कडधान्ये आणि तेलबियांच्या पेरण्यांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. 

राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार कापूस, सोयाबीन आणि तूर यांच्या लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते. कापसाची पेरणी 29 लाख 90 हजार हेक्‍टरवर झाली असून, औरंगाबाद आणि अमरावती हे विभाग यात आघाडीवर आहेत. या दोन विभागांतच कापसाची निम्मी पेरणी झाली आहे. सोयाबीनची पेरणी 27 लाख 30 हजार हेक्‍टरवर झाली असून, अमरावती आणि लातूर हे विभाग त्यात आघाडीवर आहेत. अमरावती विभागात सोयाबीनची 12 लाख हेक्‍टरवर, तर लातूर विभागात आठ लाख 69 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तूरडाळीचे भाव सध्या खूप वाढलेले आहेत. त्यामुळे, तुरीच्या लागवडीलाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. दहा लाख हेक्‍टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. त्यातही अमरावती विभाग आघाडीवर असून, तेथे चार लाख हेक्‍टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी तूर लावली आहे. त्यापाठोपाठ लातूर विभागात दोन लाख 66 हजार क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. 
उडीद, मूग या कडधान्यांची प्रत्येकी सुमारे तीन लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यांची पेरणी सरासरीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येते. भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू झाली आहेत. 

राज्यातील 355 तालुक्‍यांपैकी 257 तालुक्‍यांत आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. राज्यात एक जून ते आठ जुलैपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत 89.9 टक्के पाऊस पडला आहे. 28 जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला असून, उर्वरित 
जिल्ह्यांपैकी कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांत गेल्या दोन-तीन दिवसांत पर्जन्यवृष्टी सुरू असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Good rain boosts farming in Maharashtra