सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शनसाठी उद्या आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत प्रवेश केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा 1982 ची पेन्शन योजना रद्द करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी सर्व विभागांतील गेल्या बारा वर्षांत नियुक्‍त झालेल्या कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षकांसमोर पेन्शन गमावण्याची वेळ आल्याचे या अधिकारी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. या विरोधात गुरुवारी (ता.2) मुंबईत आझाद मैदान येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी गुरुवारी संसदेवर मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आझाद मैदानावर दुपारी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी मंगळवारी दिली.
Web Title: government employee agitation for pension