कर्जमाफी करणे सरकारला अपरिहार्यच - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सातारा - राज्य सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे अपरिहार्यच आहे. अडीच वर्षांत राज्यात तब्बल नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकार कर्जमाफी देत असेल, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय घोडे मारले आहे का? अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

येथील ज्ञानविकास मंडळातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी होते. बापूसाहेब चापेकर, राजहंस, प्रसाद चाफेकर उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले, ""राज्य सरकारने योग्यवेळी योग्य निर्णय घेतले नाहीत. शेतकरी आत्महत्येची परिस्थिती उद्‌भवण्यास हे सरकारच जबाबदार आहे. सरकारची अनास्था असल्याने तूर डाळीचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतः मुख्यमंत्री कबूल करत आहेत, की तूर डाळीत 400 कोटींचा घोळ झाला आहे. 

सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने दिली होती. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, शेतीला हमी भाव देणार, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, अशी आश्वासने होती. मात्र, त्यातील कोणतीच पूर्ण केली नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देणे तत्त्वता मान्य असून, योग्यवेळी दिले जाईल, असे सांगितले; पण यांची योग्यवेळ येणार कधी हेच समजत नाही. का निवडणूक तोंडावर आल्यावर मतांची बेरीज करण्याची वाट पाहिली जात आहे. 

नऊ मोठ्या उद्योगपतींची सुमारे साडेआठ लाख कोटींची कर्ज माफ केली जाण्याची शक्‍यता आहे. एव्हाना ते माफ करण्याशिवाय सरकारला पर्याय नाही. दर वर्षी असे उद्योगपतींची लाख कोटीचे कर्ज माफ केले जाते, तर शेतकऱ्यांनी कोणते घोडे मारले आहे. उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शाश्वत शेतीसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या पाहिजेत. पंतप्रधानांच्या हाकेला ओ देत शेतकऱ्यांनी तूर डाळीचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसारच तूर डाळ सरकारने खरेदी केली पाहिजे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. 

संवाद यात्रा बोलघेवडेपणा 
संघर्ष यात्रेला उत्तर देण्यासाठी सरकारने संवाद यात्रा काढली आहे. हा बोलघेवडेपणा आहे, अशी टीका करून चव्हाण म्हणाले, ""शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जमाफी दिली पाहिजे. 33 लाख शेतकऱ्यांचे 31 हजार 500 कोटींची कर्ज माफ करायला हवे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत आहे.''