सरकारला अधिक गतिमान करणार - मलिक

- गोविंद तुपे
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई - "मेक इन महाराष्ट्र', "जलयुक्त शिवार', सेवा हमी कायदा, "स्मार्ट सिटी', यासारखे राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प जलद गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत राज्याचे नवनियुक्त सचिव सुमीत मलिक यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. सरकारच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न तर केले जात आहेत. मात्र वेळ प्रसंगी लोकहितासाठी शिक्षण सचिव असताना केलेल्या वेगळ्या प्रयोगासारखे आणखी काही सकारात्मक प्रयोगही केले जातील असेही ते म्हणाले.

सलग 34 वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून केलेल्या कामांमुळे उत्तम प्रशासकीय अधिकारी अशी सुमीत मलिक यांची ओळख आहे.

अमरावतीला विभागीय आयुक्त असताना मेळघाटातील कुपोषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि शिक्षण सचिव असताना विद्यार्थ्यांमधील किमान कौशल्याच्या झालेल्या विकासाची चाचपणी करण्यासाठी राबविलेला "मूल्यमापनाचा पॅटर्न' यामुळे राज्यात नव्याने "मलिक पॅटर्न' रूजू झाला आहे.

मुख्य सचिव या नात्याने सर्व विभागांकडे कटाक्षाने लक्ष ठेवत असतानाच सामाजिक न्याय, महिला बाल कल्याण, आदिवासी विभाग यासारख्या विभागांकडे विशेष लक्ष देण्याचा माझा प्रयत्न करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

वडिलांचा वारसा पुढे नेला
"अधिकाऱ्याचा मुलगा अधिकारी होतोच असे नाही,' या सर्वसामान्य म्हणीला राज्याच्या नवनियुक्त मुख्य सचिव सुमीत मलिक यांनी छेद दिला आहे. त्यांचे वडील सुकुमार मलिक हे 1977 मध्ये पश्‍चिम बंगालचे मुख्य सचिव होते. मंगळवारी सुमीत मलिक यांनी मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारून वडिलांचा वारसा पुढे चालविल्याची चर्चा रंगली होती. प्रशासकीय सेवा आणि मुख्य सचिव पदाची जबाबदारी सांभाळण्याचे बाळकडू त्यांना घरातच मिळाल्याने त्याचा राज्याला अधिका फायदा होईल अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

Web Title: The government will be more dynamic