राज्यात सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना अनुदानवाटप 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - महाराष्ट्रातील लोककलावंतांनी पारंपरिक कलेचा सांस्कृतिक वारसा जपून ठेवला आहे. त्यामुळे मला नेहमीच या लोककलावंतांशी संवाद साधायला आवडते, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

मुंबई - महाराष्ट्रातील लोककलावंतांनी पारंपरिक कलेचा सांस्कृतिक वारसा जपून ठेवला आहे. त्यामुळे मला नेहमीच या लोककलावंतांशी संवाद साधायला आवडते, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे पारंपरिक कलापथकांना अनुदान वितरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी तावडे यांनी लोककलावंतांविषयी भूमिका स्पष्ट केली. तावडे या वेळी म्हणाले, की मला लोककलावंतांशी संवाद साधला तरच या लोककलावंतासाठी अजून काय करता येईल याची माहिती मिळते. आजच्या कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक ठिकाणांहून लोककलावंत आले आहेत आणि त्यामुळेच या कलावंताशी बोलणे, त्यांच्या समस्या जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना, लोककलावंतांच्या कलापथकांना तसेच भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील संस्थांना त्याचप्रमाणे प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना तावडे यांच्या हस्ते अनुदानाचे वाटप करण्यात आले. यामध्ये पूर्णवेळ तमाशा, हंगामी तमाशा, संगीतबारी, दशावतार, खरी गंमत, शाहिरी आदी कलापथकांचा समावेश आहे. या प्रयोगात्मक कलेल्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या 30 नोंदणीकृत संस्थांना, तर 73 कलापथकांचा आजच्या अनुदान प्राप्त संस्थांमध्ये समावेश आहे. ग्रामीण भागात तमाशा, लावणी, दशावतार, खडीगंमत, शाहिरी आदी कला सादर करणाऱ्या लोककलांच्या कलापथकांना हे अनुदान वितरित करण्यात येते. या वर्षी 73 संस्थांना 45,00,000 रुपये इतके अर्थसाह्य मंजूर केले आहे. 

कलापथकाचा प्रकार आणि अनुदानाची रक्‍कम खालीलप्रमाणे 
-पूर्णवेळ तमाशा- दोन लाख रुपये 
-हंगामी तमाशा- एक लाख रुपये 
- संगीतबारी- 25 हजार 
- दशावतार- एक लाख रुपये 
- खडी गंमत- 50 हजार रुपये 
- शाहिरी- पन्नास हजार रुपये