अकोल्यातील जलसंधारणाच्या कामासाठी जपानमधून मदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

अकोला - गावातील पाणी टंचाई दूर होण्यासाठी सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामासाठी जपानमध्ये राहणाऱ्या कुटुंबाने पाच लाखाची मदत जपानी मित्र मंडळाच्या सहकार्याने पाठवली. या माध्यमातून राज्यातील आणि देशातील पाणीटंचाई निवारणासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची चर्चा विदेशात रंगली आहे.

तालुक्‍यातील कान्हेरी सरप येथील जलस्त्रोत बळकटीकरणाची कामे मागील दोन महिन्यापासून सुरू आहेत. यामध्ये नाला खोलीकरण, शोषखड्डे, गाळ काढणे, सीसीटी बंधारे यासारखी विविध कामे सुरू आहेत. गावात सुरू असलेल्या या कामांची माहिती जपानमधील टोकीयो येथे वास्तव्यास असलेल्या मोहन भटकर यांच्या निदर्शनास आली. आपलाही या लोकसहभागाच्या कार्यात हातभार लागावा या हेतूने त्यांनी मदत देण्याचे निश्‍चित केले. सहज बोलता बोलता त्यांनी ही माहिती जपानी मित्र मंडळाला दिली. मित्रांनीही या सत्कार्यात अर्थसहाय्य देण्याची इच्छा व्यक्त केली. सर्वांनी मिळून गोळा झालेली पाच लाखाची रक्कम गावकऱ्यांना पाठवून दिली. जलसंधारणाच्या कामासाठी अर्थसहाय्य करणारे भूमिपुत्र मोहन भटकर यांच्यासह जपानी मित्र ताजिमा हितोमी, नोकोता सुषम, तानिआची अकिमो यांचे गावकऱ्यांनी आभार मानले आहेत.