112 क्रमांक फिरवा, मदत मिळवा! 

मंगेश सौंदाळकर
बुधवार, 3 मे 2017

मुंबई - पोलिस मदत, अग्निशमन आणि वैद्यकीय सेवा 112 क्रमांकाच्या हेल्पलाइनमार्फत एकाच छताखाली आणण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने केल्याने राज्यातही गृहविभागाने तशा हालचाली सुरू केल्या आहेत. या सेवांचे नियंत्रण कक्ष कसे असावे यावर गृहविभागात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. ही सेवा लवकरच राज्यात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अशी सेवा सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल. 

अमेरिकेत पोलिस, अग्निशमन आणि वैद्यकीय सेवेकरिता 911 हा क्रमांक आहे. त्यावर फोन केल्यावर नागरिकांना त्या त्या सेवा मिळतात. भारतातही या तिन्ही सेवा एकाच छताखाली आणण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे. केंद्रीय मंत्रालयानेही अत्यावश्‍यक सेवांसाठी एकच क्रमांक असावा, या धोरणाला मंजुरी दिली आहे. पोलिस मदतीसाठी 100, अग्निशमनकरिता 101 आणि वैद्यकीय सेवेकरिता 108 क्रमांकाची हेल्पलाइन आहे; पण या तिन्ही सेवांसाठी 112 ही हेल्पलाइन असेल. हा नंबर मोबाईलमधील पॅनिक बटणाशी जोडण्यात येणार आहे. वरील तीन प्रकारच्या सेवांसाठी 112 क्रमांकावर फोन केल्यास हा कॉल संबंधित विभागाला जोडून मदत देण्यात येईल. ही सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकारही इच्छुक आहे. 

पोलिसांकडे आधुनिक शस्त्रे 
मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यानंतर पोलिस दलासाठी अद्ययावत शस्त्रसामग्री खरेदी करण्यावर गृहविभागाने भर दिला आहे. त्यानुसार "अंडर बॅरल ग्रेनेड लॉंचर' खरेदी करण्यात येणार आहे. हा लॉंचर तीनशे मीटरपर्यंत मारा करू शकतो. नक्षलग्रस्त भागात हे शस्त्र उपयुक्त ठरू शकते. हिंसक जमावाला रोखून धरण्यासाठी "बुलेटप्रुफ वॉल'ही खरेदी करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर 6 वॉल घेण्यात येतील. तसेच, "लेझर गन विथ स्पीड कॅमेरा'ही खरेदी करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.