"एसआयटी' चौकशीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली 

"एसआयटी' चौकशीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली 

मुंबई - अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यू प्रकरणाची "एसआयटी' चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. जियाची आई राबिया यांनी याचिका दाखल केली होती. जियाने आत्महत्या केली असल्याने प्रियकर सूरज पांचोली याच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवता येणार नाही, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खटला चालेल, असे स्पष्ट करत सत्र न्यायालयाने हा खटला सुरू करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली. सीबीआयच्या तपासकार्यात कोणताही हस्तक्षेप करण्याची आवश्‍यकता नसल्याचेही खंडपीठाने सांगितले. 

3 जून 2013 ला जियाने घरात आत्महत्या केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तिचा कथित प्रियकर सूरजच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सीबीआयच्या तपासावर अविश्‍वास दाखवत या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची व याचिकेवर निर्णय होईपर्यंत सत्र न्यायालयातील खटल्याला स्थगिती देण्याची मागणी राबिया यांनी केली होती. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी राबिया यांनी आठवड्यापूर्वी कोर्टात काही पुरावे सादर केले. इंग्लडमधील वैद्यकीय अहवालात जियाच्या शरीरावरील खुणांवरून तिचा घातपात झाल्याचे दिसते, असे राबिया यांनी सादर केलेल्या कागदपत्रात म्हटले होते. मात्र सीबीआयने आतापर्यंत केलेला तपास योग्य असून राबिया यांनी इतर कोणतेही पुरावे सादर केले नसल्याने हे प्रकरण एसआयटीला सोपवत नसल्याचे न्या. रणजित मोरे आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. 

दरम्यान, सूरज यांनी याचिकेत मध्यस्थी अर्ज करत निप्षक्षपणे आपली बाजू मांडण्याचा अधिकार असल्याने या प्रकरणातील सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला दिलेली स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. राबियाचे म्हणणे खंडपीठाने फेटाळल्याने सूरजच्या अर्जालाही आता काहीच अर्थ उरत नसल्याचे सांगत हा अर्जही निकाली काढण्यात आला. जियाच्या आत्महत्येला तीन वर्षे उलटून गेली. नवा कोणताही पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. अशा वेळी विनाकारण हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे पोहचणे अयोग्य वाटत असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले. 

सीबीआयचे पुरावे पुरेसे 
जियाने आत्महत्या केल्याचे निष्कर्ष मुंबई पोलिसांनी काढला होता. सीबीआयने केलेल्या तपासातही हे प्रकरण सदोष मनुष्यवध प्रकरणात मोडते का, हे तपासण्यासाठी तज्ज्ञांचे अहवाल विचारात घेतल्याची बाबही न्यायालयाने निकालात नोंदवली आहे. या प्रकरणाचा तपास करताना सीबीआयने पुरेसे पुरावे जमा केलेले असून डॉक्‍टरांनी या प्रकरणात दिलेले अहवाल तपासाला मदत करणारे आहेत, असेही मतही न्यायालयाने नोंदवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com