हॉस्टेल, ढेकूण, अडचणी आणि मी!

Education
Education

‘ई-सकाळ‘वर अमित दाणे यांचा घराबाहेर राहून घेतलेल्या शिक्षणाचा लेख वाचला. तो वाचून मलाही माझ्या कॉलेजचे दिवस आठवले आणि हा लेख लिहायला घेतला. कारण माझाही प्रवास नाशिक-मुंबई-पुणे असा झाला आहे. 

नाशिकच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून मेकॅनिकलचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर लगेचच नोकरी सुरू केली. पण त्यात मन लागत नव्हते. कारण लहानपणापासूनच ऑटोमोबाईल्सचं खूपच वेड असल्यानं आणखी जास्त शिकायची इच्छा होती. मग मुंबईच्या ‘व्हीजेटीआय‘ या कॉलेजमध्ये ऑटोमोबाईलचा एक खास पोस्ट-डिप्लोमा कोर्स असतो, हे समजलं आणि ईश्‍वरकृपेनं तिथे दाखलाही झाला. त्यानंतर सुरू झालं माझं हॉस्टेलचं जीवन. 

‘व्हीजेटीआय‘चे ‘ए‘ हॉस्टेल खूप जुने, म्हणजे अंदाजे 90 वर्षे जुने असेल. त्यात मी राहत होतो. तिथे बहुतांश खोल्यांमध्ये लाकडी खाटा आहेत. काही निष्काळजी मुलांमध्ये आजही तिथे आपले शत्रू असलेल्या ढेकणांचा त्रास आहे. रात्रभर ढेकणांशी मारामारी करत आमचं शिक्षण सुरू होतं. तेव्हा नसानसांत ऑटोमोबाईल भिनलेलं असल्यानं ‘ढेकूण‘ या शत्रूचा कायमचा नायनाट करण्याचा उपाय आम्ही शोधला.. हत्यार होतं ‘पेट्रोल‘! शिकण्याचा भाग म्हणून आम्हाला गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणूनही काम करावं लागत होतं. मग काय! गॅरेजमधून आठवड्यातून एखादा मित्र थोडेसे पेट्रोल आणायचा आणि मग पेंटब्रश-पेट्रोलच्या साह्यानं ढेकणांची कत्तल सुरू झाली. 

याच दरम्यान कांदिवलीत ‘महिंद्रा‘मध्ये सहा महिन्यांचं ट्रेनिंग सुरू झालं. सकाळी 6.30 ला खोली सोडायची.. मग वडाळा स्टेशनमधून पहिली लोकल पकडून बांद्रा.. तिथून मग कांदिवलीसाठी दुसरी ‘स्लो‘ लोकल.. कधी कधी प्रवासामध्येच उभ्याने वडापाव खाल्ला, की झाला आपला नाश्‍ता! मग तिथे किमान 12 तास कसून काम करायचं.. सुट्टी फक्त रविवारी. रात्री 9-10 वाजता घरी आल्यानंतर मेस बंद असायची. मग अनेकदा उपाशीच झोपावं लागायचं. त्यात पुन्हा ढेकणांशी मारामारी होतीच.. 

असं करत करत ‘व्हीजेटीआय‘चं शिक्षण झालं आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ठाण्यातील एका कंपनीत निवड झाली. राहण्याची व्यवस्था होती ठाण्यातील गोकुळनगरच्या चाळीत. चाळ त्यांच्यासाठी.. आपल्यासाठी झोपडपट्टीसारखी वस्ती! एक छोटीशी खोली, त्यातच आंघोळ करायची.. इस्त्री, पाण्याचे हीटर वापरण्यास मनाई होती. खोलीत रात्री 11.30 वाजता पाणी येत असे. सार्वजनिक संडास खोलीपासून थोड्या अंतरावर होते. ‘हेराफेरी‘मध्ये दाखवलेले प्रसंग मी तिथे स्वत: अनुभवले होते. 

26 जुलै, 2005 चा मुंबईतील महाजलप्रलय मी इथे अनुभवला. झोपडीतील वरच्या मजल्यावर राहत असल्याने मला त्याचा फारसा त्रास झाला नाही; पण जवळजवळ सर्वच झोपड्यांमधील सामान वाहून गेले होते. माझ्या खिडकीतून एक भव्य काळाकुट्ट नाला दिसायचा. त्यात पुढची तीन-चार दिवस वाहून आलेली मृत जनावरे दिसत होती. इतक्‍या सगळ्या अडचणी असूनही आणि घरची तात्पुरती खालावलेली परिस्थिती माहीत असल्याने मी कधीही नाराज झालो नाही. उलट ते सर्व दिवस मी खूप एन्जॉय केले. 

हे वाचताना विशेष काही वाटणार नाही; पण ते खडतर दिवस कसे काढले असतील यावर विश्‍वास बसत नाही. आज अमेरिकेत बसून हा लेख लिहिताना मला फार आनंद होत आहे. पण त्या सर्व जुन्या दिवसांना मी ‘मिस‘ करतोय. कदाचित, आज तेवढा थरार जीवनात नाही..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com