एकनाथ खडसे भाजपचे बाहुबली, तर कटप्पा कोण?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसलेल्या एकनाथ खडसेंनी 'कटप्पाने बाहुबली को क्यूँ मारा' असा सवाल विचारला. त्याचाच संदर्भ घेत जयंत पाटल यांनी खडसेंसारख्या बाहुबलीला कोणत्या कटप्पाने मारले असेही विचारले.

मुंबई : एकनाथ खडसे भाजपमधील बाहुबली असतील तर कटप्पा कोण? असा सवाल जयंत पाटील यांनी केला. त्यांच्या या प्रश्नाने विधानसभेत उपस्थित आमदारांमध्ये एकच हशा पिकला. 

जीएसटी विधेयकासाठी सुरू असलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातल्या चर्चेत बाहुबली चित्रपटाच्या संदर्भातील चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे 'जीएसटी'बद्दल भाषण सुरू असताना त्यांनी वरील प्रश्न उपस्थित करीत सत्ताधारी भाजपला टोला हाणला. 

एकनाथ खडसे काॅग्रेस राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेच्या स्वागताला का उभे होते, असा सवाल जयंत पाटील यांनी त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थित केला. त्याच वेळी सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसलेल्या एकनाथ खडसेंनी 'कटप्पाने बाहुबली को क्यूँ मारा' असा सवाल विचारला. त्याचाच संदर्भ घेत जयंत पाटल यांनी खडसेंसारख्या बाहुबलीला कोणत्या कटप्पाने मारले असेही विचारले.