पक्षातून फुटाल तर निवडणुकीत पडाल..! - अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या गळाला विरोधी पक्षातले 29 आमदार लागल्याची अफवा पसरवली जात असली, तरी जो कोणी फुटेल त्याच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकच उमेदवार देऊन पराभव करतील, असा इशाराच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज दिला.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांच्या निवासस्थानी आज सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक झाली. या वेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह शेकाप, एमआयएम, सप या पक्षाचे आमदार उपस्थित होते.

विरोधी पक्षाच्या 19 आमदारांना निलंबित केल्याने विरोधकांनी विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार घातला आहे. त्याबाबतची रणनीती आखण्याच्या बैठकीत राजकीय उलथापालथ होणार असल्याच्या बातम्यांचा विषय चर्चेला आला. या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले, की भाजपने कोणत्याही पक्षाचा आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, तर त्यात त्यांना यश येणार नाही. मात्र, जो आमदार फुटेल त्याच्या विरोधात सर्व जण मिळून एक उमेदवार उभा करूया. शिवसेनेचे आमदार फुटले तरी त्या मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी स्वत:चा उमेदवार उभा करणार नाही, तर त्या बंडखोर उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सर्वच पक्ष मिळून शिवसेना जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील, असा विश्वास त्यांनी दिला.

Web Title: If the party elections fall feet ..!