उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम सुरू - पांडुरंग फुंडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मार्च 2017

मुंबई - मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या "उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' अभियानाची सुरुवात केल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी (ता. 28) येथे दिली. आकाशवाणीवरून शेतकऱ्यांना संदेश देऊन कृषिमंत्र्यांनी अभियानाची सुरुवात केली.

मुंबई - मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या "उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' अभियानाची सुरुवात केल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी (ता. 28) येथे दिली. आकाशवाणीवरून शेतकऱ्यांना संदेश देऊन कृषिमंत्र्यांनी अभियानाची सुरुवात केली.

शेतकरी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या वर्षातील शेतीचे नियोजन सुरू करतो. त्याप्रमाणे सरकारनेही खरीप हंगामाच्या शेतीचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा आणि घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न मिळावे, हा या नियोजनाचा मुख्य उद्देश आहे.

5 वर्षे बियाणी पुरवठा
या वर्षीपासून कृषी विकास आणि उत्पादन वाढीसाठी तालुका हा विकास घटक ठरवून नियोजन करण्यात आले आहे. सरकारने खरीप हंगामामध्ये लागणारे उत्तम प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पाच वर्षांचा बियाणे पुरवठ्याचा आराखडाही तयार केला आहे. शेतकऱ्यांना खतांचा मुबलक पुरवठा वेळेत होईल याबाबतही नियोजन केले आहे. दर्जेदार कंपन्यांची कीटकनाशके, शासकीय प्रयोगशाळेतून जैविक द्रवरूप खते आणि जैविक कीटकनाशकांच्या पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागासह कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि संशोधन संस्था यांनीही आपल्या कामाचे नियोजन केले आहे.

कृषी यांत्रिकीकरणाची मोहीम
शेतकरी बांधवांना खरीपपूर्व मशागतीची आणि पेरणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतीतील बैलांची कमी झालेली संख्या आणि ऐन हंगामात निर्माण होणारी मजुरांची टंचाई यावर मात करून पिकांच्या काढणीपर्यंतची कामे व्यवस्थित व्हावीत यासाठी कृषी यांत्रिकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांना चार बैलांचे काम करू शकणारे छोटे ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, थ्रेशर तसेच भातासाठी ट्रान्सप्लांटर, रिपर, उसासाठी पाचट कुट्टी यंत्र, फळबागेसाठी स्प्रेअर, मिस्ट ब्लोअर इ. यंत्रे खरेदीसाठी वर्षाच्या सुरुवातीपासून शासन अनुदान उपलब्ध करून देणार आहे. ही यंत्रे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीने खरेदी करण्याची मुभा सरकार देणार आहे आणि त्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

समृद्ध शेतकरी पंधरवडा
या वर्षी संपूर्ण "रोहिणी' नक्षत्रातील 15 दिवस कृषी विभाग उन्नत शेती - समृद्ध शेतकरी पंधरवडा साजरा करणार आहे. या पंधरवड्यात सर्व कृषी शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी गावोगावी जाऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहेत. विविध योजनांची माहितीही ते देतील. या वर्षात सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना विविध पिकांच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येईल.

जमीन आरोग्य पत्रिका
राज्यातील शेत जमिनींची आरोग्य पत्रिका तयार करून एक कोटी सहा लाख शेतकऱ्यांना वितरित केल्या आहेत. त्यांच्या आधारे शेतकऱ्याने आपल्या जमिनीत घेणाऱ्या पिकांकरिता आवश्‍यक मात्रेतच खते द्यावीत आणि उत्पादन खर्चामध्ये बचत करावी. याकामी शेतकऱ्यांना गावातील कृषी सहायकांचे साह्य मिळणार आहे.

असे आहे नियोजन
- 2 लाख शेतकऱ्यांना विविध पीक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार
- 1 कोटी सहा लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप
- 5 वर्षांचा बियाणे पुरवठ्याचा आराखडा
- ठिबक सिंचनासाठी तातडीने परवानगी
- आठ हजार कांदा चाळींची उभारणी
- शेतकऱ्यांना प्राथमिक प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी अर्थसाह्य

Web Title: improved agriculture prosperous farmer campaign