पारदर्शक कारभाराचा केंद्राचा आग्रह

सिद्धेश्‍वर डुकरे
मंगळवार, 25 एप्रिल 2017

राज्याच्या खात्यांचे कामकाज संकेतस्थळावर देण्याचा आग्रह

राज्याच्या खात्यांचे कामकाज संकेतस्थळावर देण्याचा आग्रह
मुंबई - सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेली विकासकामे जनतेला थेट आणि स्पष्ट समजली पाहिजेत. एकूणच सरकारचा कारभार जनतेसमोर "आरसा' बनून राहिला पाहिजे. यासाठी राज्यसरकारांनी पारदर्शक कारभार केला पाहिजे, असा आग्रह केंद्र सरकारने धरला आहे. यानुसार राज्य सरकारच्या विविध खात्यांच्या कामकाजाची माहिती ताबडतोब संकेतस्थळावर टाकण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. ही माहिती एकसमान पद्धतीनेच नागरिकांना दिली जावी, अशाही सूचना केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे केल्या आहेत.

इलेक्‍ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने 25 जानेवारी 2017 रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. यानंतर 31 मार्च 2017 रोजी मुख्य सचिवांच्या कार्यालयाने राज्य सरकारच्या विविध विभागांना पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये विविध विभागांनी एका ठराविक पद्धतीने संकेतस्थळावर आपापल्या विभागाची सर्व प्रकारची माहिती टाकावी, असे फर्मान काढले आहे. ही माहिती टाकताना संकेतस्थळही कशा प्रकारे तयार केलेले असावे. त्याचे निकष कोणते असावे, याचा उल्लेख केला आहे. हे निकष अथवा नियमावली राष्ट्रीय माहिती केंद्राने (एनआयसी) तयार केली असून केंद्राच्या प्रशासकीय सुधारणा व नागरिकांच्या तक्रारी या विभागाने स्वीकारल्या आहेत.

प्रशासन लागले कामाला
या नियमावलीमध्ये सरकारच्या सर्व विभागांची संकेतस्थळे सारखी असावीत. तसेच त्यांची रचना, निर्मिती, अद्ययावत, वापरण्यास सरळ सोपी असावी. त्याचबरोबर नागरिकांना स्पष्ट माहिती सहज उपलब्ध व्हावी, आदी तरतूद नियमावलीत आहे. यानुसार राज्य सरकारच्या विविध खात्यांनी संकेतस्थळांची निर्मिती करून त्यावर अद्ययावत माहिती टाकण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. यानुसार मंत्रालयातून विविध खात्यांचे प्रशासन कामाला लागले आहे.