इट्स ओन्ली अ मॅटर ऑफ टाईम !

इट्स ओन्ली अ मॅटर ऑफ टाईम !
इट्स ओन्ली अ मॅटर ऑफ टाईम !

`डोनाल्ड ट्रम्प इज गोईंग टू गेट समबडी किल्ड`...वॉशिंग्टन पोस्टच्या प्लम लाईन ब्लॉगवर पॉल वाल्डमनच्या नावाने या मथळ्याचा मजकूर प्रसिद्ध झाला आहे. पॉल वाल्डमन हा अमेरिकेतला बिनीचा लेखक आणि ब्लॉगर. मुद्दा आहे ट्रम्प यांच्या सामान्यांशी असलेल्या वर्तणुकीचा...या महाशयांच्या (अ)परिपक्वतेचा...अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवण्यासाठी सिद्ध झालेली व्यक्ती स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून काय-काय थेरं करू शकते, याबद्दलचा. घडले असे, की एका कामगार संघटनेच्या नेत्याने ट्रम्प महाशयांवर जाहीर टीका केली. आपण मध्यस्थी करून शेकडो लोकांच्या नोकऱया वाचवल्या, असे सांगणारे ट्रम्प खोटारडे आहेत, असे त्या कामगार नेत्याचे म्हणणे होते. राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने त्यावर फार तर एका वाक्यात खुलासा केला असता किंवा साफ दुर्लक्ष केले असते तरी चांलले असते. पण, ट्रम्प कसले थांबतात ! त्यांनी ट्विटरवरून जोन्स नावाच्या त्या कामगार नेत्यावर टीकाटिप्पणी सुरू केली. जोन्सच्या धाकाने कंपन्या देश सोडून चालल्या आहेत, जोन्स महाशयांनी कमी बोलावे आणि अधिक काम करावे, इत्यादी प्रकारची ठोसाठोशी ट्विटरवरून केली गेली. पाठोपाठ ट्रम्पच्या चेल्याचपाट्यांनीही जोन्सला धमकावणे सुरू केले. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जिवानिशी संपवण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. सोशल मीडियावर एकांगी प्रचाराचा धुरळा उडवणे तसेही आधीपासूनच सुरू होते. ट्रम्प यांच्या ट्विटराटीने त्यांचे समर्थक अधिकच चेकाळले. त्याबद्दल पॉलने सविस्तर लिहिले आहे. ट्रम्प यांनी या वातावरणात तटस्थ राहायला हवे होते. शांत राहायला हवे होते. पॉलने याच मुद्याकडे लक्ष वेधताना असे म्हटले आहे, की राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने असे वागू नये. यात ट्रम्प यांचेच नुकसान होत आहे. त्यांच्या प्रतिमेला तडा जात आहे. ट्रम्प यांच्या काळात असे एकांगी व तणावाचे वातावरण कायम स्वरुपी असणार नाही, याची कोणतीही खात्री देता येत नाही.

सार्वजनिक जीवनात अशी टीकाटिप्पणी होत असते. व्हायलाच हवी आणि ती किमान राज्यकर्त्यांनी तरी पचवायलाच हवी. लोकशाहीत विरोधी मताचा मोठा सन्मान आहे. मतभेदाच्या सूराखेरीज लोकशाहीचे अस्तित्व असू शकत नाही. पण, सोशल मीडियासारख्या पूर्णतः लोकतांत्रिक माध्यमात भलतेच सुरू झाले आहे. त्यावर लोक कसे टोकाचे वर्तन, भाष्य करतात, याची

अनेक चित्रविचित्र उदाहरणे आपल्या भारतातही सापडतील. एखादा पक्ष किंवा व्यक्तीचा अंध-अविचारी विरोध किंवा अंध समर्थन अशी दोनच टोके यातून दिसतात. शहाणपणाचा स्वर अभावानेच दिसतो. ऑनलाईन कम्युनिटी ही कम्युनिटी असली, समुदाय असला तरी त्यात परिपक्वतेचा अभाव आहे, या वास्तवाला अमेरिकाही अपवाद असू नये, हे वाचून नवल वाटते. तशीही ट्रम्प विरुद्ध हिलरी ही निवडणूक सर्वार्थाने ऐतिहासिक होती. आरोप- प्रत्यारोपांची टोकेच प्रचारात गाठली गेली. ते अद्याप थांबलेले नाही. आपल्याही देशात असे घडते. कुणाच्या तरी समर्थनार्थ एवढ्या प्रचंड प्रमाणावर सोशल मीडियावरचे लोक सक्रिय असतात, की त्या व्यक्तिच्या किंवा पक्षाच्या संदर्भात कोणताही प्रश्न विचारण्याची हिंमतच साधारण माणसांना होऊ नये. अभिव्यक्तीला नवे अवकाश देणाऱया सोशल मीडियाचा असा दहशतखोरीसाठी वापर करणे हा या नवमाध्यमांचा गैरवापरच म्हटला पाहिजे. एखाद्यावर विनाकारण टीकाटिप्पणी करण्यासाठी,अफवा पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे तर सर्वथा गैरच. तरीही ते घडले. यात सोशल मीडियासारख्या चांगल्या आयुधाचा गैरवापर होणे अधिक चिंताजनक आहे. एकूणच सोशल मीडिया, व्हॉट््स अॅपच्या फॉर्वर्डपासून ते फेसबुक-ट्विटरच्या अपडेट््स-शेअर्स- पोस्ट््सपर्यंत सारेच संशयाच्या भोवऱयात सापडले आहे. माध्यम, मग ते कोणतेही असो, त्याच्या विश्वासार्हतेपुढे असे भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहणे समाजाच्या हिताचे नाही. सोशल मीडियातून विकासाची, परिवर्तनाची प्रक्रिया फार वेगाने पुढे नेता येते. त्याद्वारे दंगली घडवून आणता येतात आणि उठावही घडवून आणले जाऊ शकतात. अरब स्प्रिंगने त्याची चुणूक यापूर्वीच दिली आहे. पॉल वाल्डमन यासंदर्भात जे म्हणतो, ते भारतालाही बऱयाच प्रमाणात लागू पडते. तो म्हणतो- द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणारे वातावरण आणि वर्तन साऱयांसाठीच चिंताजनक आहे. ट्रम्पचे सशस्त्र समर्थक  कधीही काहीही (ट्रम्प यांच्या स्वभावाला अनुसरून) घडवून आणू शकतात. इट्स ओन्ली अ मॅटर ऑफ टाईम !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com