जलयुक्त शिवारची कामे दोन महिन्यांत करा - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई - जलयुक्त शिवार योजनेची आणि शेततळ्यांची कामे येत्या दोन महिन्यांत मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील जिल्हाधिकारी यांना दिले.

मुंबई - जलयुक्त शिवार योजनेची आणि शेततळ्यांची कामे येत्या दोन महिन्यांत मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील जिल्हाधिकारी यांना दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, पंतप्रधान घरकुल आवास योजना आदींचा सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की हवामान विभागाने यंदा पाऊस चांगला पडण्याचे संकेत दिले आहेत; मात्र पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था असेल, तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण होणे आवश्‍यक आहेत. यासाठी पुढील दोन महिन्यांत आखलेली ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. गेल्या दोन वर्षांत स्पर्धात्मक पद्धतीने या दोन्ही फ्लॅगशीप कार्यक्रमासाठी कामे केली, त्याचप्रमाणे यंदाही कामे करावीत. या कार्यक्रमांमध्ये कोणतीही दिरंगाई करू नये. या योजनांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही. पुढील दोन महिन्यांच्या काळात शेती व शेतीपूरक कामांना प्राधान्य देण्यात यावे. मागेल त्याला शेततळे योजनेच्या माध्यमातून जलसंचय वाढविण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग घ्यावा. जलयुक्त व शेततळे योजनेच्या मंजुरीची कामे पूर्ण करण्याची प्रक्रिया तातडीने करावी. पुढील महिन्यात प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान गृह (ग्रामीण) योजनेच्या घरांसाठीची मंजुरी प्रक्रिया सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पूर्ण करावी. तसेच नागरी योजनेमध्ये प्रत्येक नगर परिषदेने प्रस्ताव तातडीने पंधरा दिवसांत सरकारकडे पाठवावेत. पंतप्रधान घरकुल योजनेसंदर्भात काही सूचना असल्यास त्याचा अहवाल येत्या सात दिवसांत पाठवावा. योग्य सूचनांचा अंतर्भाव करून योजनेला गती देण्यात येईल.