के. विश्‍वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हिंदीबरोबरच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्‍वनाथ यांना जाहीर झाला आहे. नवी दिल्लीत तीन मे रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दहा लाख रुपये रोख, सुवर्ण कमळ आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माहिती व प्रसारणमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी ही माहिती "ट्विटर'द्वारे दिली.

चित्रपटसृष्टीत मोलाची कामगिरी करणाऱ्या तंत्रज्ञ, तसेच कलाकारांना भारत सरकारतर्फे दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. सन 2015 चा पुरस्कार मनोज कुमार यांना मिळाला होता. आता सन 2016 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी के. विश्‍वनाथ ठरले आहेत.
के. विश्‍वनाथ यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात चेन्नईच्या एका स्टुडिओत तांत्रिक सहायक म्हणून केली. त्यानंतर ते चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले. तेलगू, तमीळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, साउंड डिझायनर अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी चित्रपटसृष्टीत सातहून अधिक दशके काम केले. के. विश्‍वनाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या "स्वाती मुथ्थम' या चित्रपटाची 59 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली होती. "सरगम', "कामचोर', "जाग उठा इंसान', "संजोग', "संगीत', "धनवान' आणि "ईश्‍वर' हे त्यांचे हिंदीतील काही गाजलेले चित्रपट आहेत.

के. विश्‍वनाथ यांना यापूर्वी पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार व अकराहून अधिक फिल्म फेअर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या 1992मध्ये त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला आहे.