किशोरी आमोणकर यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार 

किशोरी आमोणकर यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार 

मुंबई - अनेक दशके अभिजात गायकीच्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नेहमी हसतमुख राहणाऱ्या किशोरीताईंना डोळ्यांत आलेले अश्रू आवडत नसत. त्यामुळे अश्रूंना पापण्यांचा बांध घालत रसिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. 

दादर येथील निवासस्थानी सोमवारी रात्री किशोरी आमोणकर यांचे निधन झाले. प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या तळमजल्यावरील कलादालनात सकाळी 11 ते दुपारी चारपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळी तबलावादक तौफिक कुरेशी, इव्हेंट मॅनेजमेंट तज्ज्ञ शशी व्यास, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, गायिका राणी वर्मा, अभिनेता अतुल परचुरे, आनंद इंगळे, शास्त्रीय गायक महेश काळे, अनुप जलोटा, विजया मेहता यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. दुपारी शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, अश्‍विनी भिडे-देशपांडे, त्यागराज खाडिलकर, आशालता वाबगावकर, संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले, सुरेश वाडकर, संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा, अभिनेता विक्रम गोखले यांच्यासह संगीत आणि चित्रपट-नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांसह किशोरी आमोणकर यांचे शिष्य, चाहते व संगीत क्षेत्रातील व्यक्तींनी अंत्यदर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. 

उन्हाच्या झळा जाणवत असूनही किशोरीताईंच्या प्रेमापोटी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कलादालनात त्यांच्या चाहत्यांचा ओघ सुरूच होता. राज्य सरकारच्या वतीने पोलिस अधिकाऱ्याने अंतिम पुष्पचक्र वाहिल्यानंतर पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले. दुपारी सव्वाचार वाजता पोलिस बॅंडच्या साथीने आणि नंतर बंदुकीच्या फैरी झाडून शेवटची मानवंदना देण्यात आली. किशोरीताईंच्या भावमुद्रांचे मोठे पोस्टर लावलेल्या व फुलांनी सजवलेल्या ट्रकवर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर या अजरामर संगीतपर्वाचा शेवटचा प्रवास सुरू झाला. 

किशोरीताईंना डोळ्यांतील पाणी कधी आवडत नसे; त्यामुळे कुणीही रडायचे नाही, असे आवाहन करण्यात आल्याने उपस्थितांपैकी प्रत्येक जण गळ्यात दाटून आलेला आवंढा गिळून या शेवटच्या प्रवासात सहभागी झाला होता. शिवाजी पार्कवर पोलिसांनी बंदुकीच्या 21 फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. मंत्रोच्चारांच्या घोषात त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला. या वेळी आमोणकर यांच्या शिष्या माणिक भिडे यांना हुंदका अनावर झाला. 

प्रयोगशीलता आणि संवेदना जपणाऱ्या महान शास्त्रीय गायिकेला आपण मुकलो आहोत. किशोरीताईंनी शास्त्रीय गायकीत आपला स्वतंत्र ठसा उमटवताना तिला एक नवा प्रागतिक आयाम दिला. किशोरीताईंच्या जीवनाचा संगीत हाच श्वास आणि ध्यास होता. त्यांनी जीवनभर निष्ठेने सुरांची साधना केली. त्यामुळेच गानसरस्वती ही त्यांना लाभलेली उपाधी सार्थ ठरली होती. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

भारतीय संगीताला समृद्ध करण्यासाठी किशोरीताईंनी प्रचंड योगदान दिले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या मुखातून, कानातून आणि आठवणींतून त्यांचे संगीत कधीच विसरले जाणार नाही. ख्याल, ठुमरी, भजन याबरोबरच रागाची मांडणी कशी करावी, याचा त्या एक आदर्श होत्या.
- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

मी त्यांच्याकडे प्रत्यक्ष शिकलो नाही; पण माझे गुरू पंडित जसराजींनंतर मला त्या गुरुस्थानी वाटायच्या. त्यांच्या गाण्यातून मी खूप शिकलो. विद्‌वत्ता तशीच्या तशी कामामध्ये, गाण्यात उतरविण्याची क्षमता ही त्यांच्याकडे होती. त्यांच्या गाण्यात एक अद्‌भुत कल्पनाविलास होता. त्यामुळे ते गाणं प्रत्येकालाच ताजंतवानं वाटायचं. गाण्यातलं चैतन्य शोधण्याची त्यांची वृत्ती, ती भावना अगदी शेवटपर्यंत तशीच होती. 
- पं. संजीव अभ्यंकर

किशोरीताईंनी जो अमूल्य सांगीतिक ठेवा आपल्या सगळ्यांसाठी ठेवलाय तो आपल्या पुढच्या पिढ्यांना पुरून उरणारा आहे. त्यांच्या मैफलींमध्ये पंडितांच्या माना तर हलायच्याच; पण जनसामान्यांनाही त्यांचं गाणं कळायचं. शास्त्रीय संगीत अतिशय सोपं करून लोकांना ऐकवण्याची ताकद किशोरीताईंमध्ये होती. आमच्या पिढीने त्यांचं कार्य पुढे चालू ठेवणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- सावनी शेंडे-साठ्ये, गायिका

‘पुलं’ची ‘बिल्हण’ नावाची एक संगीतिका मी नव्याने बसवत होतो. ओरिजिनल संगीतिकेत त्यांचा सहभाग होता. संगीताविषयीच्या त्यांच्या जाणिवा किती प्रगल्भ आहेत, हे त्या वेळी नव्याने जाणवलं होतं. मैफलीत नैसर्गिक झराच वाहिल्यासारखा त्यांच्या सुरांचा निर्मळ प्रवाह वाहत राही. त्यांच्या गाण्यातून त्यांचे सच्चे सूर आणि तल्लख बुद्धिमत्ता प्रकर्षाने जाणवे. 
- कौशल इनामदार, संगीतकार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com