डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहूंच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा नक्कीच आनंद आहे. सध्याची जगभरातील विषमता आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्‍न सोडवायचे असतील, तर राजर्षींचे कार्य नक्कीच दिशादर्शक आहे.'' 
- डॉ. रघुनाथ माशेलकर 

कोल्हापूर - भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार आज जाहीर झाला. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी ही घोषणा आज येथे केली. यावेळी ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे, विश्‍वस्त व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, राजर्षी शाहू जयंतीदिनी सोमवारी (ता. 26) सायंकाळी साडेपाचला पुरस्कार वितरणाचा सोहळा होईल. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी असतील. 

ट्रस्टतर्फे प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात शाहू विचारांनी कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविले जाते. भाई माधवराव बागल, श्रीमती मेहरून्निसा दलवाई, क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर, व्ही. शांताराम, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज, जयंत नारळीकर, राजेंद्र सिंह, डॉ. एन. डी. पाटील, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य पी. बी. पाटील, भाई वैद्य, ज्येष्ठ नेते शरद पवार आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉ. माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे काम केले आहे. 

टॅग्स