सत्तेची खात्री नसल्याने भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई नाही - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - ‘‘भारतीय जनता पक्षाला राज्यात बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळालेली आहे. पुन्हा सत्तेवर येऊ का नाही हे त्यांना माहीत नाही, कदाचित म्हणूनच भ्रष्टाचारी मंत्र्यांवर त्यांच्याकडून कारवाई होत नाही,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लगावला. 

कोल्हापूर - ‘‘भारतीय जनता पक्षाला राज्यात बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळालेली आहे. पुन्हा सत्तेवर येऊ का नाही हे त्यांना माहीत नाही, कदाचित म्हणूनच भ्रष्टाचारी मंत्र्यांवर त्यांच्याकडून कारवाई होत नाही,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लगावला. 

ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात सरकारविरोधात वातावरण असताना विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम दिसत नाही. यावर बोलताना ‘तुम्हाला आम्ही काय करावे असे वाटते? असा प्रतिप्रश्‍न पत्रकारांनाच करून ते म्हणाले, ‘विधिमंडळात भ्रष्टाचारी मंत्र्यांबाबत गांभीर्याने प्रश्‍न उपस्थित केले, चर्चा झाली, पुरावेही सादर केले. यावर राज्य किंवा राष्ट्रीय नेतृत्वाकडून काही निर्णय घेण्याची आवश्‍यकता होती. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ ही घोषणा खरी होताना दिसत नाही. या प्रश्‍नांकडे पक्षश्रेष्ठी गांभीर्याने बघत नाहीत, तोपर्यंत सरकारवर विश्‍वास बसणार नाही.’

ते म्हणाले, ‘आम्ही सत्तेत फार वर्षे होतो. फार वर्षांनी आम्ही सत्तेतून बाहेर गेलो. त्या वेळी आरोप झाले की राजीनामा घ्या आणि चौकशी करा, कारवाई करा ही भूमिका असायची. भाजपला बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळाली आहे, पुन्हा सत्ता मिळेल का नाही, याची खात्री नाही. कदाचित त्यामुळेच असे निर्णय ते  घेत नसावेत.’

सदाभाऊंचे शेतकरी चळवळीत योगदान काय
‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे संसदेत पोचले, शेतकरी प्रश्‍नांवर ते सातत्याने आवाज उठवतात, त्यांचे काम तरी दिसते; पण यांचे (सदाभाऊ खोत) योगदान काय ?’’ या शब्दांत शरद पवार यांनी खोत यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. दरम्यान, नारायण राणे भाजपमध्ये आल्यास माझ्याकडील खाते देऊ या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची पवार यांनी खिल्ली उडवली.

Web Title: kolhapur news sharad pawar bjp