"कोयना'तून कर्नाटकला पुन्हा पाणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

पाटण - कर्नाटकातील पाणीटंचाई काळात मदत करण्यासाठी कोयना धरणातून आज सकाळी दहा वाजता पुन्हा एकदा पाणी सोडण्यात आले. या धरणाच्या पायथा वीजगृह व रिव्हर स्लुईस गेटमधून पाणी सोडले गेले. आणखी दहा ते 12 दिवस हे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. या स्थितीत कोयना नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पाटण - कर्नाटकातील पाणीटंचाई काळात मदत करण्यासाठी कोयना धरणातून आज सकाळी दहा वाजता पुन्हा एकदा पाणी सोडण्यात आले. या धरणाच्या पायथा वीजगृह व रिव्हर स्लुईस गेटमधून पाणी सोडले गेले. आणखी दहा ते 12 दिवस हे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. या स्थितीत कोयना नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

कर्नाटकमध्ये सध्या दुष्काळी स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकला पिण्याच्या पाण्यासाठी कोयना धरणातून यापूर्वीही पाणी सोडण्यात आले होते. आज पुन्हा दुसऱ्यांदा पाणी सोडले गेले. पायथा वीजगृहातून दोन हजार 100 व स्लुईस रिव्हर गेट अशा दोन ठिकाणांहून एकूण चार हजार 400 क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. कोयना धरणात सध्या एकूण 23.42 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातील 18.42 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. वीजनिर्मितीसाठीचा 67.50 टीएमसी पाणीसाठा संपल्याने सध्या वीजनिर्मितीचा चौथा टप्पा बंद करण्यात आला आहे. 

यापूर्वी 11 एप्रिल रोजी पहिल्यांदा 907 क्‍युसेक्‍स पाणी सोडण्यात आले होते. या दरम्यान गुंजाळी येथे युवक बुडाल्याने त्याच्या शोध मोहिमेत व्यत्यय येत असल्याने त्यावेळी सोडण्यात आलेले पाणी बंद केले होते. या युवकाचा मृतदेह सापडल्यानंतर पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला होता. स्लुईस गेटमधून 1940 क्‍युसेक्‍स व पायथा वीजगृह अशा दोन ठिकाणांहून एकूण चार हजार 400 क्‍युसेक्‍स पाणी सोडण्यात येत होते. पहिल्या टप्प्यात दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. एकूण तीन ते साडेतीन टीएमसी पाणी सोडले जाण्याची शक्‍यता आहे. 31 मे रोजी धरणाचे अहवाल वर्ष संपत असून कर्नाटकला पाणी देऊनसुद्धा या धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा असल्याचे धरण व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. 

कोयना नदीकाठी सावधानतेचा इशारा 
कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना आज सावधानतेचा इशारा देण्यात आला. धरण व्यवस्थापन व तहसील कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. पाटण नगरपंचायतीच्या वतीनेही नदीकाठावरील गावांमध्ये जनजागृती करून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना करण्यात आल्या.