विश्‍वासार्हता गमावल्याने काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव 

lack of trust caused defeat to ncp
lack of trust caused defeat to ncp

"पुण्यात सत्तांतर करायचेच आणि भारतीय जनता पक्षालाच कौल द्यायचा,' असा निश्‍चय बहुसंख्य पुणेकरांनी केला होता, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाच मुद्दा भाजपला मत देण्यात सर्वाधिक प्रभावी ठरल्याचे "सकाळ'च्या निकालोत्तर मतदार चाचणीत बहुसंख्यांनी स्पष्ट केले आहे. शहरात आम्हाला परिवर्तन हवे होते, असे तब्बल 78 टक्के मतदारांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला मत दिलेल्यांना शरद पवार यांचे नेतृत्व अधिक भावले, तर शिवसेनेच्या मतदारांना स्थानिक उमेदवारांचा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटला. कॉंग्रेसच्या परंपरागत मतदारांनी पक्षाला अधिक पसंती दिली. 

भाजपला मतदान करण्यात सर्वांत प्रभावी घटक कोणता, या प्रश्‍नाला उत्तर देताना "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे 45 टक्के मतदारांनी, तर 16 टक्के मतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा भावल्यामुळे पक्षाला मतदान केल्याचे म्हटले आहे. स्थानिक उमेदवारामुळे 19 टक्के, तर इतरांपेक्षा वेगळा पक्ष असल्याने 11 टक्के आणि पारदर्शकतेसाठी 9 टक्के जणांनी मतदान दिल्याचे म्हटले आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी मतदान खेचणारे नेतृत्व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच आहेत, असे सर्वेक्षण सांगते. तब्बल 41 टक्के मतदारांनी पवार यांच्यामुळेच पक्षाला मतदान केले आहे, तर 39 टक्के जणांनी स्थानिक उमेदवारामुळे, तर 20 टक्के मतदारांनी पक्ष पाहून मतदान केले. 
राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे कॉंग्रेसला मतदान केल्याचे 30 टक्के मतदारांनी, तर 58 टक्के लोकांनी स्थानिक नेतृत्वामुळे, असे म्हटले आहे. स्थानिक उमेदवार असल्याने शिवसेनेला मत दिल्याचे 34 टक्के मतदारांनी सांगितले, तर सेनेला मतदान करणाऱ्यांपैकी 30 टक्के पुणेकर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे पक्षाकडे आकर्षित झाल्याचे दिसले. 

उमेदवाराची पार्श्‍वभूमी महत्त्वाची  
मतदान करताना मतदारांनी ज्या प्रमुख घटकांचा विचार केला होता, त्यात उमेदवाराची पार्श्‍वभूमी हा सर्वांत महत्त्वाचा घटक ठरला. तब्बल 43 टक्के मतदारांनी या मुद्याला महत्त्व दिले, तर पक्ष 34 टक्के, पक्षाचे स्थानिक नेतृत्व 15 टक्के, पक्षाचा कार्यक्रम 5 टक्के असे अन्य घटकांचे महत्त्व राहिले. जात-धर्म आणि पैसा महत्त्वाचा असल्याचे अनुक्रम एक टक्का आणि दोन टक्के मतदारांना वाटले. 

सत्ताधाऱ्यांनी विश्‍वासार्हता गमावली 
पुणेकरांच्या चाचणीत पुणे महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसने विश्‍वासार्हता गमावल्याचे मत बहुतेकांनी व्यक्त केले आणि त्यामुळेच या पक्षांचा पराभव झाल्याचे मत नोंदवले. चाचणी घेतलेल्या एकूण मतदारांपैकी अनेकांनी विश्‍वासार्हता हे कारण सत्ता गमावण्याचे असल्याचे सांगितले. हे दोन्ही पक्षांचे अपयश असल्याचे आणि नेतृत्वाचा अभाव हे कारण असल्याचे काहींना वाटते. या पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेद होते, असे काही मतदारांचे मत आहे. तर पैशांची कमतरता, हे कारण फारच कमी मतदारांना वाटते. 
सत्ताधाऱ्यांचा पराभव का झाला, या प्रश्‍नाला उत्तर देताना "गमावलेली विश्‍वासार्हता' हे कारण 37 टक्के मतदारांनी दिले, तर नेत्यांमधील मतभेद 21 टक्के, स्थानिक नेतृत्वाचा अभाव 18 टक्के ही कारणे मतदारांनी दिली आहेत. 
प्रादेशिक अस्मितेच्या बाजूने आपले मत होते काय, असे विचारले असता 55 टक्के मतदारांनी होकार दिला. 


नोटाबंदीचा परिणाम नाही... 
केंद्र सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या, त्यामुळे पुणेकरांचे हाल झाल्याचे कारण देत, त्याचा परिणाम या निवडणुकीवर होईल, असा दावा करण्यात येत होता. पुणेकरांनी निकालात तो सपशेल फेटाळला आहे. या सर्वेक्षणातील 51 टक्के मतदारांनी नोटाबंदीचा मुद्दा निवडणुकीत नव्हताच, असे म्हटले आहे, तर 23 जणांनी नोटाबंदीच्या बाजूने कौल दिला, तर हा निकाल म्हणजे नोटाबंदीला पाठिंबा नव्हे, असे मतही 26 टक्के पुणेकरांनी नोंदविले. 

व्होटिंग मशिनमध्ये घोटाळा आहे काय? 
इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये घोटाळ्याची शक्‍यता खूप कमी असल्याचे मतदारांचे मत आहे. 15 टक्के जणांनी व्होटिंग मशिनमध्ये काहीतरी घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त केला असला, तरी 85 टक्के मतदारांनी ती शक्‍यता झटकून टाकून यंत्रणेबाबतचा विश्‍वास व्यक्त केला आहे. 


दोन पिढ्यांचे विचार वेगवेगळे 
एकाच घरातील ज्येष्ठ मंडळींनी परंपरागत पक्षाला मतदान दिल्याचे, तर त्याच घरातील तरुणांनी स्वतंत्रपणे विचार केल्याचे काही प्रमाणामध्ये या मतदार चाचणीत आढळून आले. तरुणांनी दिलेल्या मतांमध्ये बदलाला प्राधान्य दिल्याचे जाणवते. घरामध्ये मतविभागणी झाली काय, या प्रश्‍नाला 29 टक्के मतदारांनी "होय', तर 71 टक्के नागरिकांनी "नाही' असे उत्तर दिले. घरात मतविभागणी झाली असल्यास दोन पिढ्यांच्या विचारांतील अंतर हे कारण 72 टक्‍के नागरिकांनी दिले आहे. उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आणि पैशाचा वापर ही कारणे अनुक्रमे 15 आणि 13 टक्के नागरिकांनी दिली आहेत. 

पारदर्शकता हा प्रभाव टाकणारा मुद्दा 
खरे तर पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून मुंबई महापालिकेची निवडणूक गाजली; पण त्याचे पडसाद पुण्यासारख्या इतरही महापालिकांमध्ये उमटले. पारदर्शकता हा मतदानावर परिणाम करणारा मुद्दा असल्याचे 60 टक्के मतदारांना वाटले. 

पॅनेल टू पॅनेल मतदान 
एका प्रभागातील चारही जागांवरील एकाच पक्षाच्या उमेदवाराला मत देणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. भाजपचे 98 पैकी तब्बल 60 जण अशाच पॅनेल टू पॅनेल मतदानातून निवडून आलेले आहेत. संपूर्ण पॅनेलला मतदान केले की वेगवेगळ्या उमेदवारांना या प्रश्‍नाला उत्तर देताना तब्बल 66 टक्के मतदारांनी म्हटले, आम्ही पॅनेललाच मतदान केले. 

कोणत्या पक्षाला हरवण्यासाठी मतदान केले?  
31 टक्के मतदारांनी म्हटले आहे, की भाजपला हरवण्यासाठी मतदान केले, तर आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला हरवण्यासाठी मतदान केले असे 50 टक्के मतदारांचे म्हणणे आहे. हेच प्रमाण शिवसेनेसाठी 9 टक्के, एमआयएम 6 टक्के आणि मनसेसाठी 4 टक्के आहे. तसेच सत्तेवर असलेल्या पक्षाच्या विरोधात मतदान केले काय, या प्रश्‍नाला 52 टक्के मतदारांनी होय असे उत्तर दिले. 

अपक्षांना अधिक पसंती 
प्रमुख पक्षांखेरीज अन्य पक्षांना मते देणाऱ्या मतदारांना कोणाला मत दिले, असे विचारले असता "32 टक्के जणांनी मनसेला, 19 टक्के जणांनी शेकापला, चार टक्‍क्‍यांनी एमआयएमला, तर 38 टक्के मतदारांनी अपक्षांना मतदान दिल्याचे सांगितले.' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com