'साम'वर उद्यापासून "लळा लागला भक्तीचा'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

वारकरी संतांची चरित्रे नामवंत कीर्तनकारांकडून ऐकायला मिळणार

वारकरी संतांची चरित्रे नामवंत कीर्तनकारांकडून ऐकायला मिळणार
मुंबई - महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या वारकरी संप्रदायातील संतांच्या चरित्रावर आधारित "लळा लागला भक्तीचा' ही विशेष मालिका "साम' वाहिनीवर बुधवारपासून (ता. 10) प्रक्षेपित होत आहे. ही मालिका म्हणजे नामवंत कीर्तनकारांचे विचार आणि वारकरी सांप्रदायिक चालीतील अभंग असा दुग्धशर्करा योग आहे. संतांचे विचार सध्याच्या तरुण पिढीपर्यंत पोचविण्याचा केलेला प्रयत्न आणि वारकरी संप्रदाय टिकविणाऱ्या ग्रामीण भागातील नामवंत गायकांचा समावेश हे या मालिकेचे वैशिष्ट्य आहे.

सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी साडेसहा वाजता ही मालिका प्रक्षेपित केली जाईल. रात्री साडेदहा वाजता त्यांचे पुनर्प्रक्षेपण होईल.
गेल्या काही वर्षांपासून आषाढी-कार्तिकी वारीतून वारकरी संप्रदाय आणि "साम' वाहिनीचे अनोखे नाते निर्माण झाले आहे. सकल संतांचे समाधी सोहळे आणि राज्यातील मोठमोठे अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ते नाते अधिक बळकट झाले. या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. "लळा लागला भक्तीचा' ही मालिका याचाच पुढील भाग आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत जनाबाई, संत निळोबाराय, संत चोखामेळा यांची जीवनचरित्रे ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर, चैतन्यमहाराज देगलूरकर, योगिराज महाराज गोसावी, नामदेवशास्त्री सानप, जयवंत महाराज बोधले, जगन्नाथ महाराज पाटील, भगवतीताई सातारकर, चिन्मयमहाराज सातारकर यांच्याकडून ऐकायला मिळतील. या विशेष मालिकेची संकल्पना सिम्मी कर्ण यांची, समन्वय, संशोधन आणि लेखन "सकाळ'चे उपसंपादक शंकर टेमघरे यांचे तर दिग्दर्शन अशोक चंद्रकांत व्यवहारे यांचे आहे.

"साम'वर मधुरांगण आणि पंचनामाही
महिलांच्या जीवनावर आधारित "मधुरांगण' ही विशेष मालिका "साम'वर बुधवार (ता. 10) पासून शनिवार-रविवार खेरीज दररोज दुपारी दीड वाजता प्रक्षेपित होणार आहे. यामध्ये महिलांच्या दैनंदिन जीवनातील अडीअडचणींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत प्रबोधन करणारी मालिका "पंचनामा' ही मालिकाही बुधवारपासूनच सुरू होत आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता प्रक्षेपित होणार आहे.