आरोप-प्रत्यारोपांचा "वार' 

आरोप-प्रत्यारोपांचा "वार' 

मुंबई - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा हा शेवटचा रविवार असल्याने आज सर्वच उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग, गट पिंजून काढले. उमेदवार, कार्यकर्ते यांच्याबरोबरच दिग्गज नेत्यांनीही प्रचाराचा धडका लावला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड ते मुंबई व्हाया लातूर अशा सभा घेऊन रविवार कारणी लावला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभांनी दिवस गाजवला. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मुंबईत विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधला. वरिष्ठ नेत्यांबरोबरच ग्रामीण भागात मंत्री, आमदारांच्या, नेत्यांच्या सभांचे बार आज दिवसभर उडत होते. 

पालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर जिल्हा परिषदांसाठी 16 आणि 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांचा प्रचार रविवारी 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता संपणार असल्याने आजचा प्रचाराचा शेवटचा रविवार होता. त्यामुळे आज संपूर्ण राज्यात प्रचाराचा धूमधडाका सुरू होता. प्रत्येक गल्लीत प्रचाराच्या घोषणा गाजत होत्या. आरोप-प्रत्यारोपांनी गल्लीबोळ दुमदुमत होता. नेते, उमेदवारांसह कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून फिरत होते. मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा आज सकाळपासूनच सुरू झाला. नांदेड येथे पहिली सभा घेतल्यानंतर ते लातूरला पोचले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी मुंबईतील पश्‍चिम उपनगरात जूहू, कांदिवली आणि चारकोप अशा तीन ठिकाणी सभा घेऊन शिवसेनेसह कॉंग्रेसवर हल्ला चढवला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तत्काळ आपल्या सभेत या आरोपांना प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांनीही कळवा येथे सभा घेऊन शिवसेना-भाजपला लक्ष्य केले. 

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पश्‍चिम उपनगरात दोन सभा घेऊन भाजपवरच हल्लाबोल चढविला. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे आदित्य ठाकरेही आज मैदानात उतरले होते. मुंबईत काही ठिकाणी त्यांनी रोड शो केले. वरळी येथे झालेल्या रोड शोमध्ये खास कोळी टोपी आणि लुंगी त्यांनी परिधान केली. राज्यातील नेत्यांच्या सभांचा धूमधडाका सुरू असताना कॉंग्रेसने राष्ट्रीय नेतृत्वही मैदानात उतरवले. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बांद्रा येथे विद्यार्थी आणि तरुणांबरोबर, तर धारावीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

दिग्गज नेते मैदानात 
नेत्यांच्या सभांबरोबर उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांमुळे आज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. नोटाबंदीला सामान्यांचा विरोध नाही, तर ज्यांचा पैसा बुडाला ते विरोध करत असल्याचा हल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना आणि कॉंग्रेसवर चढवला. त्याच बरोबर पालिकेतील भ्रष्टाचारावरून त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. मुंबईत आमच्याबरोबर बोलताना विचार करा. नोटाबंदीमुळे 200 लोकांचा मृत्यू झाला, त्याचा आम्हाला त्रास होतो, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले, तर गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिकवा, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिवसेना-भाजपला लक्ष्य केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com