मुख्यमंत्री थोडक्‍यात बचावले

लातूर - निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडवरून उड्डाण केलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर गुरूवारी काही मिनिटांतच कोसळले. त्यानंतर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची पाहणी करताना पोलिस.
लातूर - निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडवरून उड्डाण केलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर गुरूवारी काही मिनिटांतच कोसळले. त्यानंतर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची पाहणी करताना पोलिस.

तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर उतरवताना विजेच्या तारांना अडखळून अपघात
लातूर/निलंगा - निलंगा तालुक्‍यातील विविध गावांना भेटी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी मुंबईला जात असताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे पायलट हेलिकॉप्टर खाली उतरवत असताना विजेच्या तारांना हेलिकॉप्टरच्या पंख्याचे पाते लागले आणि पंधरा ते वीस फुटांवर हे हेलिकॉप्टर खाली कोसळले. या अपघातातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्‍यात बचावले. तसेच त्यांच्यासोबत असलेले अधिकारी व स्वीय सहायक सुरक्षित आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या अपघाताची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी रात्री निलंगा येथे मुक्कामी होते. सकाळी आठ वाजता त्यांनी तालुक्‍यातील हलगरा, औराद शहाजानी, हंगरगा-सिरशी व अनसरवाडा येथील कार्यक्रम आटोपले. निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आले होते. दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विशेष कार्य अधिकारी केतन पाठक, स्वीय सहायक अभिमन्यू पवार व पायलट संजय कर्वे, सहायक पायलट मोहित शर्मा असे सहाजण या हेलिकॉप्टरमध्ये बसले. हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले. मात्र, काही वेळातच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

पायलटने हेलिकॉप्टर खाली घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हेलिकॉप्टर खाली घेत असताना हेलिकॉप्टरचा पंखा वीजतारेला लागला. परिणामी हेलिकॉप्टर एका घरावर व ट्रकवर कोसळले. त्यानंतर पोलिस अधिकारी, सुरक्षारक्षक, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व इतर कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.

हेलिकॉप्टरमधून धूर येत असल्याने सर्वांनाच धडकी भरली होती. अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी होत्या. या अपघातातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी हे सुरक्षित बाहेर आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पाठक यांच्या डोक्‍याला मार लागला आहे. तर दोन्ही पायलट किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तातडीने फडणवीस यांच्यासह सर्वांना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तेथे फडणवीस यांची डॉक्‍टरांनी तपासणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे कारने लातूरला आले. दुपारी 3.20 वाजता विशेष चार्टर्ड विमानाने ते आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाले. या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्‌विट करून, तसेच एक व्हिडिओ पोस्ट करून आपण सुखरूप असल्याचे राज्याच्या जनतेला सांगितले.

दरम्यान, या घटनेत वीजतारा घरावर पडल्याने काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर निलंगा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

'माझ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. पण राज्यातील 11 कोटी 20 लाख जनतेचा आशीर्वाद, आई भवानी व विठ्ठलाच्या आशीर्वादाने मला काहीही झाले नाही. जनतेने असाच आशीर्वाद पाठीशी राहू द्यावा. मला कोठेही लागले नाही.''
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

उड्डाणानंतर अवघ्या तीनच मिनिटांत झाला अपघात!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी रात्री निलंगा येथे मुक्कामी होते. सकाळी आठ वाजता त्यांनी तालुक्‍यातील हलगरा, औराद शहाजानी, हंगरगा-सिरशी व अनसरवाडा येथील कार्यक्रम आटोपले. त्यांच्यासाठी निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा जण या हेलिकॉप्टरमध्ये बसले. हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले. 50 ते 60 फूट उंच गेल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ते उडणार नाही हे पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने हेलिकॉप्टर खाली घेण्याचा प्रयत्न केला.

हेलिकॉप्टर खाली घेत असताना 11 केव्ही वीजतारेला हेलिकॉप्टरचा पंखा लागला. त्यामुळे या तारा तुटल्या. परिणामी हेलिकॉप्टर 18 ते 20 फुटांवर एका घरावर व ट्रकवर कोसळले. गंभीर बाब म्हणजे, जवळच विजेचे ट्रान्स्फॉर्मर होते. यावेळी वीज गेलेली होती. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. उड्डाण झाल्यापासून केवळ तीन मिनिटांत हा अपघात झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com