राज्याच्या तोंडाला केंद्राची पुन्हा पाने

राज्याच्या तोंडाला केंद्राची पुन्हा पाने

मुंबई - राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. दुष्काळी भागातील 26 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 36 हजार कोटींची मागणी केली असता केंद्राने फक्‍त 3600 कोटी रुपये देण्याचे कबूल केले असून "नाबार्ड‘च्या माध्यमातून 12 हजार 500 कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे. दुसरीकडे जवळपास 80 ते 90 टक्‍के कामे पूर्ण झालेले आणखी 28 प्रकल्प रखडले असून त्यासाठी पुन्हा केंद्राकडे हात पसरण्याची वेळ राज्यावर आली आहे.

कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कालखंडात "एआयबीपी‘ योजनेंतर्गत सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी देण्यात येतो. केंद्रात आता सत्तांतर झाल्यानंतर योजनेचे नाव बदलून "प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना‘ असे नामांतर करण्यात आले. या योजनेंतर्गत राज्याला केंद्राच्या वाट्याचा निधी तातडीने वितरित करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या अनुषंगाने राज्यातील अपूर्णवस्थेतील प्रामुख्याने दुष्काळी जिल्हे, शेतकरी आत्महत्याग्रस्त विभागांतील अपूर्ण प्रकल्पांचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठविला. यामध्ये राज्यातील 26 प्रकल्पांचा समावेश असून, त्यासाठी केंद्राच्या वाट्याच्या 36 हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. राज्याच्या अपूर्णावस्थेतील प्रकल्पांसाठी केंद्राकडून 3600 कोटी रुपये देण्याचे केंद्राने कबूल केले आणि "नाबार्ड‘च्या माध्यमातून राज्य सरकारला 12 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला. सध्या राज्याच्या डोक्‍यावर साडेतीन लाख कोटींचे कर्ज असून, खुल्या बाजारात सरकारची पत खालावली असल्याने "नाबार्ड‘ यातून काय मार्ग काढणार, याकडे सरकारचे लक्ष लागले आहे.

बहुतांश कामे पूर्ण झालेले 28 प्रकल्प 

वाघ लघुप्रकल्प ठाणे ः कालव्याची 85 टक्‍के कामे पूर्ण, तिलारी मोठा प्रकल्प, सिंधुदुर्ग ः शाखा कालव्यांची 60 टक्‍के कामे पूर्ण, वाघूर जळगाव ः उजवा तट कालवा 94 टक्‍के पूर्ण, वाघझिरा लघुप्रकल्प जळगाव ः बंदिस्त कालवा व सांडव्याचे काम अपूर्ण, निम्न पांझरा धुळे ः डावा कालवा 60 तर उजव्या कालव्याचे 90 टक्‍के काम पूर्ण, पुरंदर उपसा पुणे ः कामे प्रगतिपथावर, निवकणे लघू सातारा ः मातीकाम 80 टक्‍के पूर्ण, पिंपळगाव सोलापूर ः धरणाचे काम पूर्ण; मात्र कालवा आणि वितरण व्यवस्थेची कामे अपूर्ण, पळसुंदे नगर ः वाळू लिलाव बंद असल्याने काम ठप्प, नांदगाव लघू औरंगाबाद ः घळभरणी वगळता प्रकल्पाचे 60 टक्‍के काम पूर्ण, बाणेगाव जालना ः कालव्यांची 90 टक्‍के कामे पूर्ण, निम्नदुधना परभणी ः विमोचकाचे 90 टक्‍के काम पूर्ण व कालव्याची कामे प्रगतिपथावर, उगलेवाडी लघुप्रकल्प लातूर ,नांदूर मधमेश्‍वर नाशिक, बावनभडी भंडारा, सपन, झटाझमरी आणि आमपाटी अमरावती, वाई अकोला, कुकसा, सुरखंडी वाशीम, अमडापूर, लखमापूर यवतमाळ, बोराखेडी, दिग्रस आणि मासरूळ बुलडाणा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com