‘एलईडीं’च्या वापरामुळे ५४५ मेगावॉट वीजबचत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

सोलापूर - राज्यात एलईडी दिव्यांच्या वापरामुळे दररोज जवळपास ५४५ मेगावॉट विजेची बचत होते. राज्यात ३१ मार्चपर्यंत दोन कोटी दहा लाख ४० हजार ७१० दिव्यांचे वितरण झाले आहे. सर्वाधिक २८ लाख १० हजार ७७५ दिव्यांचे वितरण पुणे शहरात झाले. या दिव्यांमुळे ग्राहकांची दरवर्षी जवळपास एक हजार १०० कोटी रुपयांची बचत होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सोलापूर - राज्यात एलईडी दिव्यांच्या वापरामुळे दररोज जवळपास ५४५ मेगावॉट विजेची बचत होते. राज्यात ३१ मार्चपर्यंत दोन कोटी दहा लाख ४० हजार ७१० दिव्यांचे वितरण झाले आहे. सर्वाधिक २८ लाख १० हजार ७७५ दिव्यांचे वितरण पुणे शहरात झाले. या दिव्यांमुळे ग्राहकांची दरवर्षी जवळपास एक हजार १०० कोटी रुपयांची बचत होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशात एलईडी दिव्यांचे वितरण ‘ईईएसएल’ (एनर्जी एफिसिएन्सी सर्व्हिस लिमिटेड) या केंद्र सरकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून होते. त्यांच्याकडूनच महाराष्ट्रातही एलईडीचा पुरवठा ‘महावितरण’ला होतो. महावितरण दिवे विकण्यासाठी संबंधित कंपनीला कार्यालयाच्या आवारात जागा उपलब्ध करून देते; पण या दिव्यांच्या वापरामुळे विजेच्या वापरात बचत होत असल्याचे दिसते. राज्यात जुलै २०१५ पासून एलईडी दिव्यांचे वितरण सुरू झाले. त्यांच्या वापरामुळे जवळपास ६० टक्के विजेची बचत होते. घरगुती वापरासाठी या दिव्यांचा वापर केला जात आहे.  

महावितरणची कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर चार प्रादेशिक संचालक कार्यालये आहेत. त्यांचे १६ परिमंडळात विभाजन झाले आहे. एलईडी दिव्यांचा संबंध प्रामुख्याने घरगुती वीज वापरापुरता असल्यामुळे औद्योगिक, कृषी क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या विजेमध्ये काहीही बदल झालेला नाही; मात्र केंद्र सरकारने सुरू केलेल्या या दिव्यांच्या वितरणामुळे निश्‍चितच विजेची बचत होण्यास मदत झाली आहे. एलईडी दिव्यांच्या वापरामुळे राज्यातील २२ लाख १३ हजार टन कार्बन उत्सर्जन घटले आहे.

एलईडी खरेदीत पुणे अव्वल
पुणे ः सामान्यांच्या खिशाला परवडणारा आणि नेहमीच्या बल्बपेक्षाही पाचपट ऊर्जेची क्षमता असलेल्या एलईडी बल्ब खरेदीत पुणे जिल्हा राज्यात अव्वल आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत तब्बल २८,१०,७७५, तर ग्रामीण भागात ४,२१,१७७ एलईडी बल्बची खरेदी नागरिकांनी केली आहे. एकट्या बारामती तालुक्‍यात सुमारे ४,८९,६४४ बल्ब विकले गेल्याची नोंद केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीने केली आहे. 

रेल्वेनेही धरली एलईडीची कास
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत असलेले नागपूर, वर्धा, सेवाग्राम, बल्लारशासह एकूण २९ रेल्वे स्थानके एलईडीच्या प्रकाशझोतात न्हाऊन निघाली आहेत. त्यामुळे दरमहा पाच लाख, तर वर्षाकाठी सरासरी ६० लाखांची बचत होणार आहे. या स्थानकांवर पूर्वी एकूण दोन लाख ४८ हजार वॉटचे चार हजार ६४४ जुने दिवे होते. आता एकूण एक लाख ११ हजार १५६ वॉटचे पाच हजारावर दिवे आहेत.

एलईडी ग्राम विठ्ठलवाडी
‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून २०१३ मध्ये विठ्ठलवाडी (ता. माढा) येथील घरोघरी एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात आले होते. हे दिवे आजही प्रकाश देत असून, यामुळे विजेची बचत करणारे व पर्यावरणपूरक दिवे वापरण्याची सवयच ग्रामस्थांना लागली आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने गावातील सर्व विजेचे दिवे बंद राहत असत; मात्र एलईडी दिवे या काळात गावाला प्रकाशमान ठेवायचे. एलईडी दिव्यांचे पर्यावरणपूरक असणे, प्रदीर्घ काळ दिवे टिकणे व कमी दाबाने वीजपुरवठ्यातही प्रकाश देणे, तसेच कमी वीज लागणे यासारख्या गोष्टी तनिष्काच्या या एलईडी दिव्यांमुळे विठ्ठलवाडी ग्रामस्थांना समजल्या. त्यामुळे विठ्ठलवाडीकर पर्यावरणपूरक अशा एलईडी दिव्यांचीच खरेदी करू लागले आहेत. चार वर्षांपूर्वीचे दिवे आजही विठ्ठलवाडीकरांना प्रकाशित करत आहेत. या दिव्यांनी विठ्ठलवाडीकरांना केवळ दिव्यांचा प्रकाश दिला नसून, वैचारिकदृष्ट्याही गावाला प्रकाशमान करून पर्यावरणपूरक दिवे वापरण्यासाठी प्रत्यक्ष अनभूती देऊन प्रेरित केले आहे.

विजेच्या बचतीसाठी एलईडी दिव्यांचा वापर आवश्‍यक आहे. पूर्वी सात वॉटचा बल्ब १०० रुपयांना मिळत होता. आता नऊ वॉटचा बल्ब ६५ रुपयांना मिळतो. पुढील महिनाभरात ‘ईईएसएल’ २० वॅटची ट्युबलाइटही बाजारात आणत आहे. तिची किंमत २३० रुपये असेल.
- दीपक कोकाटे, प्रादेशिक व्यवस्थापक, ‘ईईएसएल’.

एलईडी बल्ब हे पर्यावरणपूरक तर आहेतच; पण विजेचा दाब कमी असतानाही त्यांच्यापासून भरपूर पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. वीजही कमी लागल्यामुळे बिलदेखील कमी येते. हे बल्ब वर्षांनुवर्षे टिकत असल्याने आम्हाला फार उपयुक्त ठरत आहेत. 
- मेघना राजेंद्र गुंड, विठ्ठलवाडी, ता. माढा
(तनिष्कांच्या माध्यमातून ‘एलईडी’मय झालेले गाव)

Web Title: LED's use of 545 MW power saving