फरार कैद्यांची यादी पोलिसांकडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

तुरुंगातून पळालेल्या कैद्यांची यादी तयार केली आहे. ती पोलिसांकडे देण्यात आली आहे. त्या आधारे कैद्यांचा शोध घेतला जाईल. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलिस महासंचालक, महानिरीक्षक, कारागृह विभाग 

मुंबई - विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असताना संचित व अभिवचन (पॅरोल- फर्लो) रजेवर असताना पळून गेलेल्या कैद्यांचा शोध घेण्यास तुरुंग प्रशासनाने सुरवात केली आहे. 20 वर्षांत तुरुंगातून पळून गेलेल्यांपैकी अद्याप 673 कैदी सापडलेले नाहीत. त्यांची यादी पोलिस आयुक्तालयांना देण्यात आली आहे. अमरावती, तळोजा, येरवडा, नागपूर मध्यवर्ती तुरुंगातून फरार कैद्यांची संख्या अधिक आहे. बहुतांश कैद्यांची छायाचित्रे नसल्याने आणि पत्ते चुकीचे असल्याने शोध घेणे अवघड जात आहे. 

गृह विभागाच्या अखत्यारीत राज्यातील नऊ मध्यवर्ती, 31 जिल्हा तुरुंग, 13 खुले तुरुंग, एक खुली वसाहत व 172 उपतुरुंग येतात. पॅरोल आणि फर्लोवर बाहेर पडल्यावर कैदी पळून जातात. कैद्यांनी पलायन केल्याने न्यायालयाने तुरुंग प्रशासनाची कानउघाडणी केली होती. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने पळून गेलेल्या कैद्यांची यादी तयार केली आहे. या कैद्यांपैकी अद्याप 673 कैद्यांचा शोध लागलेला नाही. मुंबई आणि ठाण्यातून प्रत्येकी दोन कैदी फरारी आहेत. 2013 पासून त्यांचा शोध घेतला जात आहे. फरार कैद्यांपैकी काही जणांचा मृत्यू झाला असावा, असे तुरुंग विभागाला वाटते. 2016 मध्ये राज्यात एक हजार 652 जणांना फर्लो रजा दिली होती, त्यापैकी 44 जण स्वतःहून हजर झाले होते. 43 जणांना पोलिसांनी पकडून तुरुंग अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले होते. नाशिकमधून 28, नागपूरमधून 29, अमरावतीत 25, मुंबई महिला कारागृहातील तीन आणि येरवडा येथील आठ जण 2016 मध्ये पळाल्याची तुरुंग विभागाकडे नोंद आहे. 

पळालेल्या कैद्यांवर गुन्हे दाखल 
कैदी पळण्याचे प्रकार रोखण्याकरिता तुरुंग विभागाने कारवाई सुरू केली आहे. फरार कैद्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरवात झाली आहे. 2012, 2015 आणि 2016 मध्ये गृह विभागाने अधिसूचना काढून गंभीर गुन्ह्यांतील कैद्यांना पॅरोल रजा देणे बंद केले आहे. कडक कारवाईला सुरवात झाल्याने कैदी पळण्याचे प्रकार कमी झाल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले.