बेकायदा बांधकामांना प्रशासनाकडून बळ

अभिजित खुरासणे
गुरुवार, 20 जुलै 2017

महाबळेश्वर - जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळी बेकायदेशीर बांधकामांना चांगलाच ऊत आला आहे. शहर व परिसरात राजरोसपणे बेकायदा बांधकामे सुरूच असून, प्रशासन मात्र सुस्तच असल्याचे सध्याचे चित्र आहे. परवानगी मागणाऱ्याला प्रशासन वर्षानुवर्ष वाट बघावे लागत असल्याने तिकडे न फिरकलेले बरे, अशी धारणा नागरिकांची झाली आहे.   

जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वरला ओळखले जाते. अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाला हळूहळू बकाल स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाबळेश्वर व परिसरातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू असून, वृक्षतोडीनंतर त्याच ठिकाणी बेकायदा बांधकामे राजरोसपणे उभी राहात आहेत. या बेकायदा बांधकामांमुळे  महाबळेश्वरचे रूपच बकाल होत चालले आहे. वृक्षतोडीने सिमेंटची जंगले वाढत आहेत. येथील प्रसिद्ध वेण्णालेकच्या प्रवाहावर काहींनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यामुळे प्रवाहास अनेक अडथळे येत आहेत. 

याबाबत तक्रारी होऊनही केवळ नोटीस व पोलिस तक्रार करण्यात आल्या. त्यापुढे काहीच साध्य झाले नाही. महाबळेश्वर- पाचगणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना अशा अनधिकृत बांधकामांमुळे मोठ्या अडचणी येत आहेत. या रस्त्यावरच अनेकांनी आपले इमले अगदी बिनदिक्कत अनधिकृतपणे रस्त्याच्या बाजूलाच बांधले आहेत.

धनदांडग्यांचे अनधिकृत बंगले, फार्महाऊस
बाहेरून येणाऱ्या धनदांडग्यांनी शहरासह ग्रामीण भागांवर कब्जाच केल्याचे चित्र दिसते. शहरी भागासह ग्रामीण भागात जागा, जमिनी घेत स्वतःची बेकायदा फार्म हाऊस, बंगले थाटले आहेत. मेटगुताड, मेटतळे, तापोळा भागांतही हीच स्थिती आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसते. गेल्या काही वर्षांपासून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशा प्रकारचे प्रशासनाचे धोरण आहे. प्रशासनामुळे महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्यच धोक्‍यात आले आहे.