गोवा महामार्गावरील पुलांवर 24 तास पहारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

महाड - महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने महत्त्वाच्या पुलांवर 24 तास पहारा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांवरही पावसाळ्यात लक्ष ठेवण्याचे काम पहारेकरी करत आहेत. नव्याने बांधलेल्या सावित्री पुलावरही सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

महाडजवळील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून 39 जणांना जलसमाधी मिळाली होती. महाडच्या या दुर्घटनेनंतर जुन्या पुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यामुळे राज्यातील ब्रिटिशकालीन सर्वच पुलांची शास्त्रोक्त तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, तर पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा मुद्दाही प्रकर्षाने पुढे आला. महाडच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सर्व महत्त्वाच्या पुलांवर आता 24 तास पहारा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात महामार्गावरील किंवा मोठ्या नदींवरील पुलावर विशेष नजर ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या पुलांवर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.

नदीच्या पाण्याच्या पातळीत होणारे बदल, पुलाच्या एखाद्या भागाला निर्माण झालेला धोका किंवा पडझड यांची माहिती त्वरित जिल्ह्याच्या आपत्कालीन नियंत्रण कक्ष व संबंधित विभागाला देण्याचे काम सुरक्षारक्षक करणार आहेत. रायगडमधील लोणेरे, मोहोप्रे, सावित्री आणि रत्नागिरीतील जगबुडी येथील पुलांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे सावित्री पूल नव्याने बांधलेला असतानाही येथेही खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.